आमदार डॉ. राजीव पोतदार यांचा पुढाकार; कामगार, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून मिळणार मोठा दिलासा
का टा वृत्तसेवा : भूषण सवाईकर | मयंक वरघट
कळमेश्वर, दि. ३१ ऑक्टोबर : कळमेश्वर–गोंडखैरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक २८९ येथे उड्डाणपूल उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज शनिवारी सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडला. सेतूबंधन योजनेअंतर्गत या उड्डाणपुलासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, आमदार डॉ. राजीव पोतदार आणि आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते पूजन व कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

रेल्वे गेट वारंवार बंद होत असल्याने या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. कळमेश्वर एमआयडीसीतील कामगार, विद्यार्थी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यातून सेतूबंधन योजनेअंतर्गत ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी दिली.
भूमिपूजनप्रसंगी बोलताना आमदार पोतदार म्हणाले की, या उड्डाणपुलामुळे कळमेश्वर एमआयडीसीतील कामगार, शिक्षणासाठी शहरात येणारे विद्यार्थी, शेतकरी तसेच लिंगा, उपरवाही, कळंबी, गोंडखैरी, सेलू, केतापार आदी गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगांमधून नागरिकांची सुटका होऊन प्रवास अधिक सुलभ होईल. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी कळमेश्वर शहर नागपूरचे सॅटेलाइट सिटी म्हणून विकसित होत असल्याचे नमूद केले. या उड्डाणपुलामुळे गोंडखैरी आउटर रिंग रोड तसेच नागपूर–काटोल महामार्गावरील वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होईल आणि अपघातांचा धोका कमी होण्यास हातभार लागेल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला कळमेश्वर-ब्राह्मणी नगराध्यक्ष अविनाश माकोडे, उपाध्यक्ष धनराज देवके, टी अँड टी ग्रुपचे मुख्य अभियंता चेतन पाचखेडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, तालुकाध्यक्ष प्रमोद हत्ती, शहराध्यक्ष नितीन गेडाम, कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कड यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश वरुळकर यांनी केले, तर आभार प्रगती मंडल यांनी मानले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क I भूषण सवाईकर : 📲 97645 07440







