कळमेश्वर एमआयडीसीतील केमफिल्ड कंपनीत भीषण स्फोट! सुरक्षा भिंत कोसळली; इमारतीच्या काचा रस्त्यावर विखुरल्या
कॉम्प्रेसरमध्ये प्रेशर निर्माण झाल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती; तीन कामगार जखमी झाल्याची चर्चा, पोलिसांकडून अधिकृत दुजोरा नाही; प्रदूषणाच्या आरोपांमुळे आधीच नागरिकांच्या निशाण्यावर असलेली कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
काटा वृत्तसेवा : मयंक वरघट
कळमेश्वर : कळमेश्वर औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) केमफिल्ड सेल्युलोज प्रायव्हेट लिमिटेड या पावडर निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज पहाटे साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. सेल्युलोज पावडर तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान मिक्सिंगचे काम सुरू असताना कॉम्प्रेसर मशीनमध्ये प्रेशर निर्माण झाल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, मशीनच्या बाजूची सुरक्षा भिंत कोसळली, तर इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटून रस्त्यावर विखुरल्या. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच कळमेश्वरचे ठाणेदार मनोज काळबांडे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्फोट झालेला भाग आणि नुकसानग्रस्त परिसर सील करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली. कळमेश्वरचे तहसीलदार विकास बिक्कड यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्फोटामुळे कंपनीच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मशीनलगत असलेली सुरक्षा भिंत कोसळली असून इमारतीच्या काचा फुटल्याने परिसरात काचेचे तुकडे पसरले. घटनेच्या वेळी कंपनीत दुसरी शिफ्ट सुरू होण्याची वेळ असल्याने संबंधित भागात कामगारांची उपस्थिती कमी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीत सुमारे ४५ कायमस्वरूपी कर्मचारी आणि २५० पेक्षा अधिक कंत्राटी कामगार कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या घटनेत तीन कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत असली, तरी कळमेश्वर पोलिसांकडून अद्याप त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तसेच या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचीही माहिती अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे जखमींची नेमकी संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

प्रदूषणाच्या आरोपांमुळे आधीच नागरिकांचा रोष; कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
केमफिल्ड कंपनीविरोधात यापूर्वीच कळमेश्वर परिसरातील वरोड्यासह अनेक गावांतील नागरिकांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून आवाज उठविला होता. कळमेश्वरच्या खडक नाल्यातील पाणी कंपनीमुळे प्रदूषित होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. या नाल्याचे पाणी गावातून वाहत असून, ते पिण्यायोग्य राहिले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी वरोड्याच्या सरपंच संगीता वासनिक यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित शासकीय यंत्रणांकडे तक्रारी दाखल केल्याची माहिती आहे. कंपनीच्या कथित प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून, या प्रश्नावरून कंपनीविरोधात स्थानिक पातळीवर आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली होती.

अशा पार्श्वभूमीवर आता कंपनीत झालेल्या स्फोटाच्या घटनेने औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्फोटामागील नेमके कारण काय, कॉम्प्रेसरची देखभाल नियमितपणे केली जात होती का, सुरक्षा यंत्रणा योग्य स्थितीत होती का आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रदूषणाच्या आरोपांमुळे आधीच नागरिकांच्या रोषाला सामोरे जाणाऱ्या कंपनीला या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात उभे राहावे लागले आहे.

रात्रीच्या वेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात सविस्तर तपासणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे स्फोटाचे नेमके कारण आणि नुकसानीचे स्वरूप यांची तपासणी रविवारी सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या तपासातून कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी आणि स्फोटाची वास्तविक कारणे समोर येण्याची अपेक्षा आहे.
प्रदूषणाच्या तक्रारींची चौकशी आणि आता स्फोटाच्या घटनेचा तपास—या दोन्ही बाबतीत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.








