आदिवासी आश्रमशाळांच्या विकासासाठी राज्यस्तरीय संघटना सज्ज!

महाराष्ट्र आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेच्या राज्याध्यक्षपदी किशोर वानखेडे यांची निवड; नवीन कार्यकारिणीची घोषणा

का टा वृत्तसेवा | किशोर वासाडे

कन्हान : महाराष्ट्रातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या समस्या सोडविण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने महाराष्ट्र आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेने नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा केली आहे. संस्थेच्या राज्याध्यक्षपदी किशोर वानखेडे यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर संघटनात्मक कार्याला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुंबई येथील सचिवालयातील जिमखाना सभागृहात संस्थेच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालविताना संस्थाचालकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि त्यांच्या निराकरणासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संस्थेच्या कामकाजात समन्वय वाढविण्यासाठी विभागनिहाय अध्यक्षांसह नवीन राज्य कार्यकारिणी गठित करण्यात आली.

यापूर्वी नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात आश्रमशाळांच्या विविध प्रश्नांकडे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर राजेंद्र सरोदे, किशोर वानखेडे, भगवानराव देशमुख आणि माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संस्थेच्या मागण्या व समस्यांबाबत चर्चा केली होती. शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती माजी अध्यक्ष राजेंद्र सरोदे यांनी बैठकीत दिली. तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, आदिवासी विकास मंत्री आणि संबंधित घटकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी राज्य कार्याध्यक्ष तथा माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी संस्थेच्या हितासाठी सर्व पदाधिकारी व संस्थाचालकांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. आमदार केवळराम काळे, माजी खासदार अनंतराव गुढे, राजेंद्र डांगे, माजी आमदार देवराम मुंढे, शिवराम झोळे आणि शेखर टेंगले यांनीही मार्गदर्शन केले.

नवीन राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

  • राज्याध्यक्ष : किशोर वानखेडे
  • राज्य कार्याध्यक्ष : माजी आमदार टेकचंद सावरकर
  • सरचिटणीस : नारायणराव श्रीमनवार
  • कोषाध्यक्ष : अशोकराव वानखेडे
  • राज्य उपाध्यक्ष : जितेंद्र नाईक, राजेंद्र डांगे, प्रशांत देवरे, देवराम मुंढे
  • राज्य चिटणीस : डॉ. शशिकांत वाणी, दिलीप पेटकर, देविदास नागरे, बबलू हकीम
  • राज्य कार्यकारिणी सदस्य : मनोहर चटप, ॲड. मृणाल जोशी, नागेशमामा सावंत, सुभाष भांगरथ

राज्य मार्गदर्शक मंडळ : राजेंद्र सरोदे, भगवानराव देशमुख, आमदार डॉ. चंद्रकांत रघुवंशी, माजी खासदार अनंतराव गुढे, माजी आमदार शिवराम झोळे, उत्तमराव इंगळे, राजेश मुन, आमदार केवळराम काळे, डॉ. शिरीषकुमार नाईक, युवराज पाटील, चामेश्वर महाणे, पोपटऱाव सोनवणे, राजेंद्र सोनवणे व गंपुजी घाटोळे.

विभागीय अध्यक्ष :

  • ठाणे विभाग – नितीन प्रल्हादराव पाटील
  • अमरावती विभाग – प्रवीण दिगंबर पेटकर
  • नाशिक विभाग – मनोज हिरे
  • नागपूर विभाग – गजानन पाटोडे

बैठकीच्या शेवटी कोषाध्यक्ष अशोकराव वानखेडे आणि उपाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी आभार प्रदर्शन केले.

दरम्यान, आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक सक्षम करण्यासाठी आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, प्रशासनिक अडचणी आणि संस्थाचालकांचे प्रश्न यांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून शासन, प्रशासन आणि आश्रमशाळा चालक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण होऊन राज्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईलवर, थेट आपल्या गावातून

 किशोर वासाडे : 📲 9423403810

0
0

Leave a Reply

Realted News