महाराष्ट्रात गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून मुभा : बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल
मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते फंडे वापरले, पक्ष कसे फोडले, चुकीचे निकाल कसे दिले, हे सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्रात गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात असून राज्यात निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका थोरात यांनी केली आहे.
विधानसभेत झालेला राडा, आमदार निवासातील भांडण आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात सध्या जे घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. बीडमधील निरपराध सरपंचाला ज्या पद्धतीने मारले गेले, ते मानवतेला लाज वाटणारे आहे. एक आमदार पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करतो, एक आमदार कॅंटीनमधील वेटरला मारहाण करत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना गुंडांनी मारहाण केली ते गुंड भाजपचे पदाधिकारी असल्याची टीका थोरात यांनी केली आहे.
महाराष्ट्रात गुंड फोफावले आहेत
एखाद्या समाजाला विरोध करायचा, वडीलधार्यांना काहीही बोलायचे अशी भाजपने काही गुंड आणि वाचाळवीरांना मुभा दिलेली आहे. एक प्रकारे राज्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच आज महाराष्ट्रात नियंत्रण नाही, गुंड फोफावले आहेत. दहशत निर्माण झाली आहे आणि ही दहशत भाजप पुरस्कृत असून राष्ट्रीय पक्ष म्हणणार्या पक्षाला हे लाजिरवाणे आहे, असेही थोरात म्हणाले.
सध्या गुंड विधानसभेत येत आहेत
पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, मी 40 वर्षे विधानसभा सदस्य म्हणून काम केले आहे, पण अशी संस्कृती कधीही नव्हती. वादविवाद असतात परंतु त्यानंतर चहापानासाठी एकत्र यायचे. परंतु, सध्या गुंड विधानसभेत येत आहेत. मारहाण करतात. त्या गुंडांना संरक्षण दिले जात आहे. मारहाण करणार्याला संरक्षण आणि मार खाणार्याला मात्र शिक्षा हा काय प्रकार आहे. हे जनतेने वेळीच ओळखले पाहिजे. विधानसभेत झालेला राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काटेच्या मागचे खरे सूत्रधार शोधले पाहिजे
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रवीण गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर आणि संत परंपरांचे विचार समतेचे व बहुजनांचे विचार सांगत आहेत. हा विचार काही कडवट लोकांना सहन झाला नाही. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाला आहे. हा काटे कोण आहे? तो गुंड आहे आणि तो पदाधिकारी आहे. त्याला पद दिले जात आहे. या काटेच्या मागचे खरे सूत्रधार शोधले पाहिजे. असे काटे जनतेने मोडून काढले पाहिजे. जनतेने अधिक संवेदनशील होऊन जागृत झाले पाहिजे. सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आम्ही तर लढणारच आहोत, परंतु जनतेनेही याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे
महायुती सरकारने अनेक खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आमिष दाखवले. मात्र, पंधराशे वेळेवर दिले जात नाही. अनेक लाडक्या बहिणींची नावे दररोज कमी केली जात आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्य पाठीशी उभे राहणे हे सरकारची जबाबदारी आहे. मात्र, सरकार याबाबत बोलत नाही.