सुप्रिया सुळे यांच्या मुलीचा साखरपुडा निश्चित; रेवती सुळे होणार नागपूरची सून
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा साखरपुडा निश्चित झाल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. रेवती सुळे हिचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्यासोबत ठरल्याची माहिती आहे. ही माहिती माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावरून दिल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
या आनंदवार्तेमुळे पवार कुटुंबासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असून, रेवती सुळे आता नागपूरची सून होणार असल्याने या विवाहाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोण आहेत सारंग लखानी?
सारंग अरुण लखानी हे नागपूर येथील रहिवासी असून ते उद्योगक्षेत्रातील प्रतिष्ठित कुटुंबातून येतात. ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. उद्योगविश्वात सक्रिय असण्यासोबतच सारंग लखानी यांची ओळख क्रीडाक्षेत्रातही आहे. त्यांनी बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, खेळाडूवृत्तीचा स्वभाव ही त्यांची वेगळी ओळख मानली जाते.
रेवती सुळे यांची शैक्षणिक आणि सामाजिक ओळख
रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या असून विजय सुळे हा त्यांचा भाऊ आहे. रेवती यांनी London School of Economics या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेतून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. शांत स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि सामाजिक जाणिवेमुळे त्यांची स्वतंत्र ओळख आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान रेवती सुळे यांनी प्रथमच सार्वजनिक जीवनात प्रवेश करत आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्या काळात त्यांचा संयमित संवाद आणि उपस्थिती अनेकांच्या लक्षात राहिली होती.
गडकरी–फडणवीस मध्यस्थीची चर्चा
या विवाहाबाबत आणखी एक चर्चेचा मुद्दा म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जुळवाजुळव प्रक्रियेत मध्यस्थी केल्याची सूत्रांकडून मिळालेली माहिती. त्यामुळे हा विवाह केवळ कौटुंबिक आनंदाचा विषय न राहता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला आहे.
नागपूर आणि बारामती या दोन राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये या नात्यामुळे एक नवा स्नेहबंध निर्माण होत असल्याची चर्चा रंगली आहे.








Users Today : 6
Users Yesterday : 31
Views Today : 10
Who's Online : 0