नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंची बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी

नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंची बस दरीत कोसळली;

7 जणांचा मृत्यू, 7 जखमी

काठमांडू : नेपाळच्या गंडकी प्रांतातील गोरखा जिल्ह्यात भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक मायक्रोबस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी मनाकामना मंदिराचे दर्शन करून परत येत होते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मायक्रोबस मनाकामना मंदिरातून तनहुन जिल्ह्यातील अंबुखैरेनी भागाकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरून घसरली आणि सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये डझनभराहून अधिक भारतीय भाविक प्रवास करत होते.

या अपघातात जखमी झालेल्या 7 प्रवाशांना तातडीने भरतपूर येथील चितवन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले.

गोरखा जिल्हा वाहतूक पोलीस कार्यालयाचे प्रमुख सूरज अर्याल यांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असून सर्वजण भारतीय नागरिक आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख भरत बहादूर बीके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख मुथु कुमार (58), अनामालिक (58), मीनाक्षी (59), शिवगामी (53), विजयल (57), मीना (58) आणि तमिलरसी (60) अशी झाली आहे.

दरम्यान, या अपघातात बसचा चालक सुरक्षित बचावला असून त्याचा मदतनीस जखमी झाला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

0
0

Leave a Reply

Realted News