“खरात प्रकरणात मोठी नावे रडारवर : मंत्री, अधिकारी आणि महिला आयोगाच्या
धक्कादायक संबंधांची SIT चौकशी”
काटा वृत्तसेवा I नाशिक
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या अटकेनंतर उघड होत असलेल्या धक्कादायक माहितीमुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भोंदूगिरी, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि कोट्यवधींच्या संपत्तीच्या आरोपांबरोबरच आता या प्रकरणात मंत्री, आमदार-खासदार, वरिष्ठ अधिकारी आणि काही संस्थांशी संबंधित व्यक्तींचे संबंध तपासाच्या रडारवर आले आहेत.
महाराष्ट्रा महिला आयोगाच्या अध्यक्षासह सह कित्येक मंत्री, आमदार-खासदारांसह अनेक अधिकारी या भामट्या लबाड खरात भोंदूबाबाच्या दावणीला लटकून असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीची गती वाढवली असून प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः खरातची सखोल चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘चॉइस पोस्टिंग’, बढती आणि वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी काही अधिकारी खरातच्या संपर्कात होते, अशी बाब पुढे येत आहे.
भोंदूगिरीच्या आडून लैंगिक शोषणाचा आरोप
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, खरातने दैवी शक्तीचा दावा करत महिलांचा विश्वास संपादन केला. पतीच्या मृत्यूची भीती दाखवून, गुंगीकारक औषध देत संमोहन करून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील पीडित महिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या पेनड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती असून, त्यामध्ये काही प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भोंदूगिरीच्या आडून २०० कोटींची माया आणि संशयास्पद व्यवहार
मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी असलेल्या खरातने गेल्या दीड दशकात राजकीय नेते, बडे सनदी अधिकारी आणि पोलीस दलातील वरिष्ठांनाही आपल्या श्अंकशास्त्राश्च्या जाळ्यात ओढले होते. लष्करी शिस्तीचा आव आणणाऱ्या या भोंदूने या माध्यमातून प्रचंड संपत्ती जमा केली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पाथर्डी शिवार येथील विविध सर्व्हे क्रमांकांत (१३२, १३८, २०३ इ.) खरातची सुमारे ३० एकर जमीन असून, तिची बाजारभावानुसार किंमत १५० कोटींच्या घरात आहे. कहांडळवाडी व मिरगाव या भागात खरातची ४५ एकर जमीन असल्याचे समोर आले आहे. या व्यतिरिक्त इतर शहरांमध्येही त्याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा संशय असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
गुन्हे शाखेच्या छाप्यात खरातच्या सिन्नरमधील फार्महाऊसवरून महत्त्वाची कागदपत्रे, पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तपासात सुमारे २०० कोटींच्या मालमत्तेचा तपशील समोर आला असून, जमीन व्यवहार आणि गुंतवणुकीत काळ्या पैशांचा वापर झाल्याचा संशय आहे.
ब्लॅकमेलिंग रॅकेटचा उलगडा
या प्रकरणाशी संबंधित आणखी एका गुन्ह्यात एआयच्या मदतीने महिलांचे अश्लील फोटो तयार करून त्यांना ब्लॅकमेल केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात नीरज जाधव याची भूमिका संशयास्पद असून, तो खरातच्या कार्यालयाशी संबंधित असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
“भोंदूच्या जाळ्यात महाराष्ट्राची सत्ता?” प्रशासनावर प्रश्नचिन्ह
एमपीएससी आणि यूपीएससीद्वारे निवड झालेले काही अधिकारीदेखील बढती आणि पोस्टिंगसाठी अशा भोंदू व्यक्तींचा आधार घेत असल्याचे समोर येत असल्याने प्रशासनातील अंधश्रद्धा आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुपाली चाकणकर राजीनामा देणार का?: राष्ट्रवादीसह अंजली दमानियांचा निशाणा
बलात्काराचा आरोप असलेल्या अशोक खरातचे केले पाद्यपूजन
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्योतिषी व तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेचे शोषण केल्याचा आरोप असलेल्या व अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची पाद्यपूजा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. याचसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ट्विट करत चाकणकरांवर निशाणा साधला असून बलात्काराचे आरोप असणार्या व्यक्तीचे महिला आयोगाच्या अध्यक्षा पाय धुतानाचे व्हिडिओ? असा सवाल उपस्थित करत टीका केली आहे.

रूपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर आता रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो.ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही, आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलिस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

जगात एपस्टीन तर महाराष्ट्रात खरात फाईल्स :
खरात प्रकरणावरून राऊतांचा धक्कादायक इशारा, चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी
या प्रकरणाचे पडसाद राजकीय पातळीवरही उमटले आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणाची तुलना “एपस्टीन फाईल्स”शी करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच रुपाली चाकणकर यांच्या खरातसोबतच्या संबंधांवरून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावर टीका करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणाची तुलना थेट जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी करत जगात एपस्टीन फाईल्स गाजतात, तसेच महाराष्ट्रात आता खरात फाईल्स गाजत आहेत, असा स्फोटक दावा केला. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या अशोक खरात याला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, राज्यातील काही बडे राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी त्याच्या संपर्कात होते, अशी चर्चा रंगली आहे. याशिवाय त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचेही आरोप होत आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाचे पाय धुणे अत्यंत लाजिरवाणे – विजय वडेट्टीवार
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही! महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशोक खरातसारख्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाचे पाय धुणे अत्यंत लाजिरवाणे आहे.
महिलांवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे पूजन करणाऱ्या अध्यक्षांकडून राज्यातील महिलाना न्याय मिळणार कसा? त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून राजीनामा द्यावा त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही! एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतात, इतर महिलांना संविधान वाचण्याचे उपदेश देतात. दुसरीकडे भोंदू बाबाचे पाय धुतात हेच का यांचे पुरोगामीत्व? हीच का यांची संविधानावरील श्रद्धा? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
अशा लिंगपिसाटाला मदत केल्यास जबाबदारी कोण घेणार? अंधारेंचा निशाणा
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणी अटक झाल्यानंतर आता या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महिलाआयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या ”छत्रछायेखाली” अशा भामट्यांचे उद्योग सुरू आहेत,ष् असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणी देखील केली आहे.
एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अशोक खरातला अटक केली. खरातच्या ताब्यातून पोलिसांनी एक पेनड्राइव्ह जप्त केला असून, त्यात ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी अशोक खरात याच्याकडे जात होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या अशोक खरात याच्या संस्थेवर पदाधिकारी म्हणून आहेत. यावरून सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे
तपासाचा कक्षा वाढणार, प्रभावशाली व्यक्तींच्या संबंधांची चौकशी सुरू
एसआयटीकडून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, राजकीय संबंध आणि ब्लॅकमेलिंग नेटवर्क यांचा सखोल तपास सुरू असून, आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(ही बातमी पुढील तपासाच्या घडामोडींनुसार अद्ययावत केली जाईल.)










