महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दिग्गजांचा जलवा; सिकंदर, शिवराज, पृथ्वीराज तिसऱ्या फेरीत
पुणे : वाघोली येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दिग्गज मल्लांनी दमदार कामगिरी करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला असून, स्पर्धेला चांगलीच रंगत आली आहे. रामकृष्ण सातव पाटील कर्तव्य फाऊंडेशनच्या आयोजनाखाली होत असलेल्या या स्पर्धेत गादी आणि माती या दोन्ही प्रकारांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत.
गादी विभागात पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याने धाराशिवच्या धीरज बारस्करवर 12-2 अशी एकतर्फी मात करत आपली ताकद दाखवली. त्याचप्रमाणे नांदेडच्या शिवराज राक्षे याने पुण्याच्या श्रेयस होळकरचा 10-0 अशा मोठ्या फरकाने पराभव करत प्रभावी विजय नोंदवला.

दरम्यान, कोल्हापूरचा माजी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने सांगलीच्या सत्पाल शिंदेला 10-0 ने नमवत आपली दावेदारी भक्कम केली. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने अमरावतीच्या वेताळ शेळकेवर 8-1 अशी मात करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले.
माती विभागात गतविजेता सिकंदर शेख याने पुण्याच्या मनीष रायतेवर 8-2 असा विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले. त्याच्या खेळामुळे वाघोलीतील मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या विभागात नाशिकच्या बाळू बोडकेला गडचिरोलीच्या विक्रमसिंह भोसलेने 4-1 अशा चुरशीच्या लढतीत पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
एकूणच, सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील आणि हर्षवर्धन सदगीर या आघाडीच्या मल्लांनी तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी किताबासाठीची स्पर्धा अधिकच रंगतदार बनली असून, पुढील फेऱ्यांमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.









