कळमेश्वर MIDC : एशियन केमिकल्स प्रकरण – अनुदानित खताचा काळाबाजार
शेतकऱ्यांसाठी असलेला अनुदानित युरिया लंपास करणारी टोळी उघड
सहा कृषी सेवा केंद्रांचा एफआयआरमध्ये उल्लेख
काटा वृत्तसेवा I जिल्हा प्रतिनिधी
कळमेश्वर : स्थानिक औद्योगिक वसाहतीतील एशियन केमिकल्स कंपनीत शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनुदानित युरियाचा बेकायदेशीर साठा आढळल्याप्रकरणी नोंद झालेल्या गुन्ह्यात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एफआयआरमध्ये कंपनीला युरिया पुरवठा करणाऱ्या सहा कृषी सेवा केंद्रांची नावे समोर आली असून, तपासाचे धागेदोरे कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील खत विक्री केंद्रांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक प्रशांत सहदेव राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एशियन केमिकल्सचे मालक आसिफ सलाट यांनी औद्योगिक वापरासाठी शेतकऱ्यांसाठी असलेला अनुदानित युरिया विविध कृषी सेवा केंद्रांकडून अनधिकृतरीत्या खरेदी केल्याची कबुली दिली आहे.
एफआयआरमध्ये राव अॅग्रो एजन्सी (कळमेश्वर), सतनाम कृषी सेवा केंद्र (खापा), एस. कृषी सेवा केंद्र (सावनेर), आदर्श कृषी सेवा केंद्र (सावनेर), महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र (कळमेश्वर) आणि प्रगती कृषी सेवा केंद्र (कळमेश्वर) या सहा केंद्रांचा उल्लेख करण्यात आला आहे.
तपासादरम्यान कंपनी परिसरातून आरसीएफ व एचयुआरएल कंपनीच्या युरिया खताच्या सुमारे २८ हजार ३८२ रुपयांच्या बॅग्ज व रिकाम्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा युरिया औद्योगिक उत्पादनासाठी वापरला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, शासनाच्या अनुदानावर मिळणारे खत उद्योगांकडे वळविल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणात कंपनी मालक आसिफ सलाट यांना अटक करण्यात आली असली, तरी संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांवर अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक राजकीय व सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनुदानित खताचा काळाबाजार करणाऱ्या सर्व संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. कृषी विभागाकडून जप्त बॅगवरील बॅच क्रमांक व पुरवठा साखळीची सखोल चौकशी सुरू असून, संबंधितांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त लवकरंच्……..










