मुलगा आणि सुनेकडून वडिलांना मारहाण
बुलढाण्यात गुन्हा दाखल
बुलढाणा : वृद्ध वडिलांना जेवण न देता त्यांच्यावर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा आणि सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित वडिलांचे नाव गणेश प्रल्हाद मोहळे (वय ५८) असे असून, त्यांच्या तक्रारीवरून मुलगा संदीप मोहळे आणि सून उर्मिला मोहळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मोहळे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. ते मुलासोबत राहत होते. मात्र, घरात किरकोळ कारणांवरून नेहमी वाद होत असत. तसेच त्यांना नियमितपणे जेवणही दिले जात नव्हते, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
२१ मार्च रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घरात वाद झाल्यानंतर परिस्थिती चिघळली. “घरातील सर्व वस्तू मीच आणल्या असून तुम्ही काहीच आणले नाही,” असे गणेश यांनी म्हटल्याने संतापलेल्या मुलाने टिकासाच्या दांड्याने त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली.
त्यानंतर सुनेनेही कंबरपट्ट्याने मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत गणेश मोहळे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर २६ मार्च रोजी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.










