भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
मुलगा ताब्यात, पत्नी फरार
नाशिक : बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी तपासाची दिशा आता कुटुंबीयांकडे वळवली असून, मोठी कारवाई केली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी असलेली पत्नी कल्पना खरात फरार असल्याने पोलिसांनी तिचा मुलगा हर्षवर्धन खरात याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी नाशिक पोलिसांचे पथक खरातच्या निवासस्थानी गेले असता, कल्पना खरात पोलिसांच्या येण्यापूर्वीच पसार झाल्याचे समोर आले. त्यानंतर घरात उपस्थित असलेल्या हर्षवर्धनला ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकादमीत आणण्यात आले आहे. येथे एसआयटीकडून अशोक खरातची कसून चौकशी सुरू असून, लवकरच बाप-लेकाची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे.

जमीन बळकावण्याचा गंभीर आरोप
या प्रकरणात अंधश्रद्धा पसरवण्याबरोबरच जमिनी बळकावण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. शिर्डीतील सुमारे ४ एकर भूखंड व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, कल्पना खरात, तसेच अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
रावसाहेब गोंदकर या शेतकऱ्याला व्याजाने पैसे देऊन सावकारी जाळ्यात अडकवून त्यांची जमीन बळकावल्याचा आरोप आरोपींवर आहे. या प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कल्पना खरात अटकेच्या भीतीने फरार झाली आहे.

शोधमोहीम तीव्र
कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, नाशिक आणि शिर्डी परिसरात संभाव्य ठिकाणी छापेमारी सुरू आहे. लवकरच तिला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तपासाला वेग; नवे खुलासे अपेक्षित
अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून विविध आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि भोंदूगिरीद्वारे उभारलेल्या जाळ्याची चौकशी सुरू आहे. मुलालाही ताब्यात घेतल्यामुळे या गुन्ह्यात कुटुंबीयांचा सहभाग किती आहे, याबाबत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशोक खरातच्या केबिनची SIT कडून झडती
औषधांच्या बाटल्या, विविध खडे जप्त
लाईव्ह स्क्रीनिंग करत ‘डिजिटल पंचनामा’ पूर्ण

ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात एसआयटीने पीडित महिलांना सोबत घेऊन गुन्ह्याचा सविस्तर पंचनामा केला. या झाडाझडती दरम्यान पथकाने घटनास्थळावरून औषधांच्या बाटल्या, विविध आकारांचे खडे आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, तपास पथकाने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या साहाय्याने या संपूर्ण प्रक्रियेचे लाईव्ह स्क्रीनिंग करत ‘डिजिटल पंचनामा’ पूर्ण केला आहे.
लैंगिक शोषणाचे 8, आर्थिक फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल
अशोक खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषणाचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल असून, ताज्या तपासानंतर त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एसआयटीने पीडितांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष घटनाक्रम जाणून घेतल्याने खरातच्या अडचणी वाढल्या असून, या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलीस आता त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याचा अधिक सखोल तपास करत आहेत.









