कळमेश्वर MIDC : अनुदानित खताचा काळाबाजार, शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

कळमेश्वर MIDC : एशियन केमिकल्स प्रकरण – अनुदानित खताचा काळाबाजार

शेतकऱ्यांना वंचित ठेवून कारखान्याला युरिया पुरवठ्याचा आरोप

शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा, शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

काटा वृत्तसेवा I जिल्हा प्रतिनिधी

कलमेश्वर : एमआयडीसी परिसरातील एशियन केमिकल कारखान्यावर १२ मार्च रोजी कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर युरिया घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. छापेमारीदरम्यान कारखान्यात शेतकऱ्यांसाठी अनुदानावर उपलब्ध असलेले युरियाचे पोते आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

                        शेतकरी संघटनांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, रामकृष्ण कृषी सेवा केंद्र, महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, प्रगती कृषी सेवा केंद्र, खापा येथील सतनाम कृषी सेवा केंद्र तसेच सावनेरमधील आदर्श कृषी सेवा केंद्र यांनी शेतकऱ्यांसाठी असलेला अनुदानित युरिया काळ्या बाजारात जास्त दराने एशियन केमिकल कारखान्याला विकला.

                       संघटनांच्या म्हणण्यानुसार, या केंद्रांकडे युरिया उपलब्ध असतानाही तो शेतकऱ्यांना देण्यात आला नाही. उलट नफा मिळवण्यासाठी तो कारखान्याला वळवण्यात आला. तसेच शेतकरी युरिया घेण्यासाठी गेले असता त्यांना जबरदस्तीने इतर उत्पादने—लहान पॅकेट्स किंवा द्रव पदार्थ—खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

१० वर्षांच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
                         या प्रकरणात संबंधित कृषी सेवा केंद्रांच्या मागील १० वर्षांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी आढळल्यास त्यांचे परवाने तत्काळ रद्द करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. अनुदानित युरिया कारखान्यांना विकणे हे नियमबाह्य असून, ही गंभीर अनियमितता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तहसीलदारांना निवेदन सादर
                        या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कलमेश्वरचे तहसीलदार विकास बिक्कड यांना जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या नावे निवेदन दिले.

                        निवेदनात एशियन केमिकल कारखान्यात जप्त करण्यात आलेल्या युरिया पोत्यांच्या क्रमांकांच्या आधारे सखोल तपास करावा, तसेच संबंधित कृषी केंद्रांच्या आवक-जावक नोंदींची छाननी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुरेश बोधाने, गौपाल ढोले, पवन इगले, नितीन बोधाने, आशीष इंगले, मनीष शेंडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

                        दरम्यान, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.

0
0

Leave a Reply

Realted News