पालघर : भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी; अंनिसचे पोलिस व प्रशासनाला निवेदन

पालघर : भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी

अंनिसचे पोलिस व प्रशासनाला निवेदन

संजय भोईर, जिल्हा कार्याध्यक्ष, पालघर जिल्हा अंनिस

पालघर : भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेविरोधात प्रभावी कारवाई करण्याची मागणी करत अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) पालघर जिल्हा शाखेच्या वतीने ३० मार्च २०२६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र नाईक यांना देण्यात आले.

निवेदनात भोंदू अशोक खरात बाबा व संबंधितांवर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, जिल्ह्यातील भोंदू बाबांवर सतत देखरेख ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

यावेळी अंनिसतर्फे संतांच्या अंधश्रद्धा विरोधी विचारांवर आधारित दहा पुस्तिकांचा संच तसेच अंनिसचे वार्तापत्र अधिकाऱ्यांना भेट देण्यात आले. अंनिसचे सदस्य अण्णा कडलासकर, संजय भोईर, संदेश घोलप, जगदीश राऊत आणि ॲड. गणेश भापकर यांनी योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली.

महिलांमध्ये जागृतीसाठी ‘उमेद’ अंतर्गत मोहिमेची तयारी
दरम्यान, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेविरोधात महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘उमेद’ अभियानांतर्गत परवानगी मिळावी यासाठी पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी अशोक भागडे यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनाही संत साहित्याच्या पुस्तिका आणि अंनिस वार्तापत्र भेट देण्यात आले.

या मोहिमेला परवानगी मिळाल्यास पालघर जिल्ह्यातील सुमारे दीड लाख महिलांपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवता येईल आणि ग्रामीण भागातील अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करता येईल, असे मत अंनिस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या उपक्रमात जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक भाते, राज्य कार्यकारी समिती सदस्य अण्णा कडलासकर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय भोईर, कार्यवाह जतीन कदम, संदेश घोलप यांच्यासह जगदीश राऊत, धनंजय वायदंडे, स्वाती भोईर, आसिफा शेख, ॲड. गणेश भापकर, लीलाधर रायसिंग, प्रीता पाटील, रुपेश राऊत, सीताराम प्रभू, स्वरांगी कदम, पारगावकर, भगवान राजपूत, अंजली पाटील, मनोज कामडी आदी उपस्थित होते.

प्रशासकीय ग्रंथालयाला सदस्यत्वाची विनंती
तसेच, अंनिस वार्तापत्राचे सदस्यत्व घेण्याची विनंती पालघर जिल्हा प्रशासकीय ग्रंथालयाचे प्रमुख प्रशांत पाटील यांना करण्यात आली. यावेळी ग्रंथालयाचे गणेश किणी यांना अंनिस वार्तापत्र भेट देण्यात आले.

0
0

Leave a Reply

Realted News