भोंदू बुवाबाजीविरोधात अनिसचे प्रशासनाला निवेदन
कठोर कारवाईची मागणी
नागपूर, ३ एप्रिल : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) कळमेश्वर तालुका शाखेच्या वतीने भोंदू बुवाबाजी आणि अंधश्रद्धेविरोधात प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस निरीक्षकांमार्फत पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून, समाजात वाढत्या अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अनिसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात भोंदू बुवा, ज्योतिषी आणि अंधश्रद्धा पसरविणाऱ्या प्रवृत्तीमुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेषतः अशोक खरात यांसारख्या प्रकरणांचा उल्लेख करत अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन सादर करताना तालुका उपाध्यक्ष महेंद्र शेंडे, कार्याध्यक्ष गायक अरुणभाऊ सहारे, सचिव अरुण वाहने, युवा विवेक वाहिनीचे प्रज्वल तागडे तसेच सदस्य तुषार काळे आणि राजपाल बनसोड उपस्थित होते.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
- अशोक खरात प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
- प्रत्येक पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कक्ष स्थापन करावा.
- जादूटोणा विरोधी कायद्याची नियमावली तातडीने तयार करावी.
- सोशल मीडियावरील बुवा-बाबा आणि ज्योतिषींच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी.
- गावपातळीवर अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर वेळीच पोलीस हस्तक्षेप करावा.
अनिसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला आश्वासन दिले की, जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्थेचे कार्यकर्ते सर्वतोपरी सहकार्य करतील. हे निवेदन २ एप्रिल २०२६ रोजी सादर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









