नागपूरात महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला
नझुल प्लॉट प्रकरण निकाली काढण्यासाठी मागितली होती रक्कम
नागपूर, प्रतिनिधी : नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ₹५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. बुधवारी रात्री उशिरा ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शिवाजीनगर–महाल परिसरातील नझुल प्लॉटवरील बांधकाम प्रकरण निकाली काढण्यासाठी संबंधित महसूल सहाय्यकाने ₹५ लाखांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. आरोपीने तक्रारदाराला आपल्या निवासस्थानाजवळ रात्री उशिरा बोलावून रक्कम आणण्यास सांगितले. नियोजनानुसार, रात्री सुमारे ११.३० वाजता तक्रारदाराकडून ₹५ लाखांची रक्कम स्वीकारताना आरोपीला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
आरोपीच्या अंगझडतीत ₹५ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. यामध्ये काही खऱ्या नोटांसह बनावट नोटांचाही समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच आरोपीकडून Apple iPhone जप्त करण्यात आला आहे.

सध्या आरोपीच्या निवासस्थानी झडती सुरू असून अधिक पुरावे गोळा करण्यात येत आहेत. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक भारती गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक पडघान करीत आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार आहे.








