धीरेंद्र शास्त्रींवर बंदीची मागणी; आमदार रोहित पवार आक्रमक
“शिवछत्रपतींबाबतचे विधान संतापजनक,” म्हणत ‘भोंदू बागेश्वर’वर कारवाईची मागणी
मुंबई, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तीव्र टीका करत महाराष्ट्रात त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. नागपुरातील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
रोहित पवार यांनी म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज थकले आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे दिला,” असे कथित विधान अत्यंत संतापजनक आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रात स्थान नसून त्यांच्यावर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात भाष्य केले होते. त्यांनी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, तसेच युद्धामुळे थकलेल्या महाराजांनी त्यांच्याकडे राजपाट सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा केला. या विधानानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि इतिहासाचा अवमान होत आहे. “यापूर्वीही काही संतांबाबत वादग्रस्त विधान करण्यात आली आहेत. हे प्रकार फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावणारे आहेत,” असे ते म्हणाले.

तसेच, या प्रकरणात राज्य सरकारने कारवाई करावी, अन्यथा जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. “शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.




