कळमेश्वर तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
कळमेश्वर, दि. 1 मे : कळमेश्वर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या समारंभात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी आमदार कृपाल तुमने यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला सलामी देत महाराष्ट्र दिनाचा गौरवपूर्ण उत्सव साजरा केला.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष अविनाश माकोडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अजय वाटकर, तहसीलदार विकास बिक्कड, उपअधिक्षक भूमी अभिलेख मिलिंद शिंदे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती कुंभार, नायब तहसीलदार संदिप तडसे, ज्योती जाधव, संजयकुमार कांबळे, मंगेश ढवळे, बिलाल खान, जेष्ठ नागरिक संघटनेचे कृष्णाजी बगडे, सुरेश डोंगरे, ब्रिजलाल रघुवंशी, नगर परिषदेचे सदस्य ताराचंद बांबल, मनोज शेंडे, सविता नाथे तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी आणि स्थानिक प्रजापिता ब्रह्मकुमारी शाखेच्या भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान आमदार कृपाल तुमने व तहसीलदार विकास बिक्कड यांनी उपस्थितांना कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत सामाजिक एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी कळमेश्वर नगर परिषदेच्या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. एकूणच, हा सोहळा देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश देणारा ठरला.

व्यसनमुक्ती अभियानाचा शुभारंभ
याच प्रसंगी आमदार कृपाल तुमने यांनी ब्रह्मकुमारी केंद्राच्या वतीने ‘नशामुक्त भारत – स्वर्णिम भारत’ रथास हिरवा झेंडा दाखवून व्यसनमुक्ती अभियानाचा शुभारंभ केला. समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.








