बंगाल विधानसभा निवडणूक: 15 मतदान केंद्रांवर पुनर्मतदानाचा निर्णय
कोलकाता, प्रतिनिधी: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 15 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे पुनर्मतदान शनिवारी पार पडणार आहे.
29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानावेळी डायमंड हार्बरमधील 4 आणि मगराहाट पश्चिममधील 11 मतदान केंद्रांवर हिंसाचार, ईव्हीएममध्ये छेडछाड आणि गोंधळाच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या घटनांमुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम झाल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

दरम्यान, कोलकात्यातील ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यानंतर प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. शहरातील सात स्ट्राँग रूमच्या 200 मीटर परिसरात पाच किंवा अधिक लोकांच्या जमावास बंदी घालण्यात आली असून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) सुमारे 700 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

खुदीराम अनुशीलन केंद्रातील स्ट्राँग रूमबाहेर तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला. तृणमूल काँग्रेसने ईव्हीएममध्ये छेडछाड व अनधिकृत हालचालींचा आरोप केला होता. मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावत पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, तीन स्तरांच्या सुरक्षेमुळे कोणतीही छेडछाड शक्य नसल्याचेही आयोगाने म्हटले आहे.
तो VIDEO बघा, ज्यानंतर गोंधळ झाला…
टीएमसीने X वर व्हिडिओ पोस्ट करून लिहिले – सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन उघडपणे निवडणुकीत गैरव्यवहार करत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने आयोगाने आवश्यक ती सर्व उपाययोजना केल्याचे सांगितले आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0