रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये रुपाली चाकणकरांसोबत भोंदू खरातचा तीन दिवस मुक्काम

भोंदू खरात प्रकरणात नवा खुलासा

रुपाली चाकणकरांसोबत गुवाहाटी दौऱ्याची माहिती समोर

रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये तिघांचा तीन दिवस मुक्काम; उद्या SIT कडून पुन्हा चौकशी

भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, आता Rupali Chakankar आणि भोंदू अशोक खरात यांनी एकत्र गुवाहाटी दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर देखील सोबत असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या खुलाशामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

तपास यंत्रणांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 दरम्यान अशोक खरात, रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर यांनी गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये तीन दिवस मुक्काम केला होता. या काळात त्यांनी कामाख्या देवी मंदिरात दर्शन आणि विशेष पूजा-अर्चा केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुवाहाटी परिसरातील काही मंदिरांमध्ये नवग्रह पूजा आणि विशेष धार्मिक विधी केले जात असल्याने या दौऱ्याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. ब्रह्मपुत्रा नदी परिसरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

उद्या पुन्हा चौकशी

दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणात Rupali Chakankar यांची उद्या विशेष तपास पथकाकडून (SIT) पुन्हा चौकशी होणार आहे. यापूर्वी 10 तारखेला त्यांची चौकशी करण्यात आली होती.

त्या वेळी माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी तपास यंत्रणांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याचा दावा केला होता. तसेच, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आवश्यक ते पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, भोंदू अशोक खरात याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण, जादूटोणा तसेच अवैध मार्गाने संपत्ती जमवल्याचे गंभीर आरोप असून, या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू आहे.

0
0

Leave a Reply

Realted News