लालपरी आर्थिक संकटात; एसटी महामंडळाचा संचित तोटा 11,160 कोटींवर

लालपरी आर्थिक संकटात; एसटी महामंडळाचा संचित तोटा 11,160 कोटींवर

मोफत व सवलतीच्या प्रवासाचा सरकारी परतावा ठरणार महामंडळासाठी संजीवनी

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) गंभीर आर्थिक संकटातून जात असून, महामंडळाचा संचित तोटा तब्बल 11,160.48 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात वार्षिक तोट्यात मोठी घट झाल्याने महामंडळ आर्थिकदृष्ट्या सावरण्याचे संकेत मिळत आहेत. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाली आहे.

नागपूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीतून एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा तपशील समोर आला. त्यानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महामंडळाला 19,106 कोटी रुपयांचा वार्षिक तोटा झाला होता. मात्र, 2024-25 या वर्षात हा तोटा कमी होत 855.32 कोटी रुपयांवर आला आहे. वार्षिक तोट्यातील ही घट लक्षणीय मानली जात असून, महामंडळाच्या आर्थिक व्यवस्थापनात सुधारणा झाल्याचे चित्र दिसत आहे.

तथापि, मागील थकबाकी आणि व्याजाच्या वाढत्या भारामुळे एसटीचा एकूण संचित तोटा अजूनही 11 हजार कोटींच्या पुढे कायम आहे. त्यामुळे महामंडळासमोरील आर्थिक आव्हाने अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.

सवलतींच्या परताव्यावर एसटीची भिस्त

राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘महिला सन्मान’ योजनेअंतर्गत महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. या योजनांच्या बदल्यात सरकारकडून मिळणारा परतावा एसटीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

महामंडळाच्या सूत्रांनुसार, ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर एसटीमधील महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सवलतीच्या तिकिटांचा आर्थिक भारही वाढला आहे. सरकारने या योजनांचा निधी वेळेवर उपलब्ध करून दिल्यास महामंडळाचा संचित तोटा कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

2025-26 च्या लेखापरीक्षणाकडे लक्ष

दरम्यान, 2025-26 या चालू आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण अद्याप पूर्ण झालेले नसल्याने यंदाच्या आर्थिक स्थितीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सवलत योजनांच्या परताव्यामुळे एसटीच्या उत्पन्नात कितपत सुधारणा होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जन माहिती अधिकारी सा. रा. मूर्ती यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली असून, या माहितीसंदर्भात काही आक्षेप असल्यास प्रथम अपिलीय अधिकारी विकास जगताप यांच्याकडे दाद मागता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News