पुण्यात बांगलादेशी महिलांवर कारवाई; बुधवार पेठेतून पाच महिलांना ताब्यात
पोलिसांच्या चौकशीत उघड झाली ओळख; बेकायदेशीर वास्तव्यासह वेश्याव्यवसायाचा संशय
Pune : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. फरासखाना पोलिसांनी विशेष शोधमोहिम राबवत पाच महिलांना ताब्यात घेतले असून, त्या बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्यास असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
रविवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत बुधवार पेठेतील माचिस बिल्डिंग आणि परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. चौकशीदरम्यान काही महिलांच्या बोलण्यात वेगळा लहेजा जाणवल्याने पोलिसांना संशय आला. महिलांनी स्वतःला पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे सांगितले होते. मात्र, पुढील चौकशीत त्यांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळून आली.
चौकशीत उघड झाली ओळख
पोलिसांनी महिलांकडे भारताबाबत प्राथमिक माहिती विचारल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच, त्यांनी सांगितलेल्या पश्चिम बंगालमधील गावांबाबतही स्पष्ट माहिती देण्यात त्या अपयशी ठरल्या. यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळावला.
तपासात संबंधित महिलांकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेले पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य अधिकृत कागदपत्रे नसल्याचे समोर आले. प्राथमिक चौकशीनुसार, या महिला बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात दाखल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
वेश्याव्यवसायाशी संबंध असल्याचा संशय
Hrishikesh Rawale यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या महिला बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसायाशी संबंधित असल्याची बाब तपासात समोर आली आहे. त्या स्वतःच्या इच्छेने या व्यवसायात कार्यरत असल्याची माहितीही चौकशीतून पुढे आली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, Amitesh Kumar यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांकडून अवैध स्थलांतरितांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. गेल्या 11 महिन्यांत पुणे शहरातून एकूण 95 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईमुळे शहरातील अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अवैध वास्तव्यासंबंधीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0