राज्यात SIR मोहीम सुरू; मतदार यादीतील नाव घरबसल्या तपासता येणार
निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शक सूचना

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन (SIR) मोहिमेबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली असून, मतदार यादीतील नाव तपासणे आणि आवश्यक प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीतील माहिती पाहता येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर राज्यनिहाय मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आपले राज्य, जिल्हा आणि संबंधित मतदारसंघ निवडून नाव शोधता येणार आहे. याशिवाय, पूर्वी कोणत्या मतदारसंघात मतदान केले होते याची माहिती असल्यास शोध प्रक्रिया अधिक सोपी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

SIR अंतर्गत मतदार गणना फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरी आल्यानंतर आवश्यक माहिती व कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आगाऊ बुथ क्रमांक, मतदारसंघ आणि सीरिअल नंबरची माहिती तपासून ठेवल्यास प्रक्रिया जलद आणि सोपी होईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.
तसेच, पूर्वी इतर शहर किंवा राज्यात मतदार नोंदणी झालेली असली तरी आयोगाने तयार केलेल्या मॅपिंग व्यवस्थेद्वारे संबंधित माहिती शोधणे शक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.









