Nagpur : बनावट बांधकाम कामगार प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश

बनावट बांधकाम कामगार प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर ग्रामीण पोलिसांची दोन ऑनलाईन केंद्रांवर धाड

नागपूर  : बांधकाम कामगारांसाठीच्या शासकीय योजनांचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी दोन ऑनलाईन केंद्रांवर कारवाई करत तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तीने बांधकाम क्षेत्रात किमान 90 दिवस काम केल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्रात काम न केलेल्या व्यक्तींना खोटी प्रमाणपत्रे देऊन शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला जात असल्याची बाब तपासात समोर आली आहे.

बांधकाम क्षेत्रात काम न केलेल्यांना ’90 दिवस काम’ केल्याची बनावट प्रमाणपत्रे

यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत अपर कामगार आयुक्त, नागपूर यांच्या निर्देशानुसार विशेष दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली होती. पथकांनी विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवून गैरप्रकारांचा शोध घेतला. तपासादरम्यान शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

बेला येथील ऑनलाईन केंद्रावर कारवाई

पहिली कारवाई बेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाजार चौक परिसरातील ‘आयांश ऑनलाईन सर्व्हिस सेंटर’ येथे करण्यात आली. तपासणीदरम्यान बांधकाम कामगार नोंदणीसाठी वापरण्यात येणारी संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. चौकशीत ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र चालक शुभम लोणारे (रा. धामणगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

मांढळ येथील इंटरनेट कॅफेमध्ये कोरी प्रमाणपत्रे जप्त

दुसरी कारवाई कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांढळ येथील ‘भोयर इंटरनेट कॅफे’ येथे करण्यात आली. या ठिकाणी तपासणीदरम्यान ठेकेदाराच्या सही व शिक्क्यासह असलेली कोरी आणि अपूर्ण प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली. ही कागदपत्रे बेकायदेशीर नोंदणी प्रक्रियेसाठी वापरण्याच्या उद्देशाने तयार ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी कॅफे चालक प्रणय भोयर तसेच ठेकेदार प्रजय विलास गजभिये (दोघेही रा. मांढळ, ता. कुही, जि. नागपूर) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल

शासनाची दिशाभूल करून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी 30 मे 2026 रोजी संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) आणि 336(3) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

नागपूर ग्रामीण पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

0
0

Leave a Reply

Realted News