Farmer’s Suicide : शिरजगाव मोझरी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकऱ्याने विष घेऊन घर गाठले; कुटुंबाला सांगून रडत घेतला निरोप

नापिकीमुळे निर्णय; शिरजगाव मोझरीतील समाजमन हेलावून टाकणारी घटना

14 तासांपूर्वी :>
तिवसा : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतात विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर या शेतकऱ्याने घर गाठले. घरी आल्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांना कवटाळले आणि रडत-रडत स्वत:ची हतबलता स्पष्ट केली. निराश, हताश होऊन हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या तोंडून कळताच कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. परंतु विष संपूर्ण शरीरात भिनल्यामुळे ती सार्थ ठरू शकली नाही.
                        आत्महत्या करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचे नाव मोहन हनुमंत वाघ (४५) आहे. शुक्रवारी दुपारी ४ ते ५ च्या सुमारास ही घटना घडली. दुपारी शेतात गेल्यावर शेताची विदारक स्थिती पाहून मोहन हतबल झाले आणि शेतातून परत येताना त्यांनी विष प्राशन केले. घरी येऊन सर्वांना कवटाळत त्यांनी हा प्रकार सांगितला. त्यामुळे कुटुंबीयांनी अगोदर स्थानिक रुग्णालयात व तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने नंतर त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ केली. परंतु विष शरीरात भिनल्याने रात्री ९ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
                        मोहन वाघ यांच्याकडे दीड एकर व आईच्या नावे दीड एकर अशी एकूण ३ एकर शेती आहे. शेतीच्या आधारेच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई आहे. सततची नापिकी व मागील महिन्यात १६ तारखेला झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पूर्ण पीक वाहून गेले. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. या वर्षीच्या पेरणीसाठी त्यांनी पैशाची उसनवारी केली होते. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर खासगी सावकारांचे देखील कर्ज होते.
                         शुक्रवार, २६ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता शेतातून फेरफटका मारून येतो, असे सांगून ते शेतात गेले. काही तासानंतर परत घरी येऊन कुटुंबातील सदस्यांना कवटाळले व मी कीटकनाशक प्राशन केले असे सांगून ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्यांच्या पत्नीने क्षणाचाही विलंब न करता ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तिवसा व नंतर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु रात्री ९ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

1
0

Leave a Reply

Realted News