हिंस्र प्राण्यांचा हौदोस – शेतीला दिवसा वीजपुरवठा द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा (घाडगे) : तालुक्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. अति पावसामुळे खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर, मृग बहाराच्या काळात पावसामुळे संत्रा बहारही लागला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बी हंगामावर अवलंबून आहे. मात्र, शेतीसाठी आवश्यक असलेला नियमित वीजपुरवठा महावितरणकडून रात्रीच्या वेळेस आणि अत्यंत अनियमित पद्धतीने दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
तालुक्यातील बोदर ठाणा, चिंचोली, सोनेगाव, रानवाडी, रहाडगाव, नरसिंगपूर आणि पांजरा बंगला या परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीचा वीजपुरवठा थांबवून दिवसा किमान १२ तास थ्री-फेज वीजपुरवठा देण्याची मागणी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता (महावितरण) आर्वी, खासदार अमर काळे, विधान परिषद आमदार दादाराव केचे, तसेच आमदार सुमित वानखडे यांना निवेदन सादर केले आहे.

या भागात घनदाट जंगल असल्याने वाघ, अस्वल यांसारख्या हिंस्र प्राण्यांचा सतत वावर असतो. बोदर ठाणा परिसरात वाघ गावापर्यंत आल्याचे अनेकांना दिसून आले आहे. नरसिंगपूर व चिंचोली येथे यापूर्वी हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात शेतीला जाणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ करण्यासारखे आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, सावळी (बु) आणि राजनी फीडरवरून दिवसा नियमित वीजपुरवठा बंद करून रात्री वीजपुरवठा दिला जातो. त्यामुळे ते जीव धोक्यात घालून मोटार पंप सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते. शिवाय सावळी सबस्टेशनमधील मुख्य ट्रान्सफॉर्मर कमी क्षमतेचा असून तो नेहमीच ओव्हरलोड होतो. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होतो आणि अनेकदा मोटारपंप जळतात.
यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की—
शेतीसाठी दिवसा किमान १२ तास नियमित थ्री-फेज वीजपुरवठा द्यावा.
सावळी सबस्टेशनला अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवावा.
रात्रीचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद करावा.
या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास संबंधित गावांतील शेतकरी महावितरण विरोधात तीव्र आंदोलन व उपोषण छेडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.











Users Today : 1
Users Yesterday : 11