‘मोहब्बत अवॉर्ड’ने सन्मानित :
संध्या राजुरकर, भन्ते नागदीपंकर, प्रशांत हाडके, रूपेश पवार आदी समाजसेवक
का टा वृत्तसेवा I
नागपूर : आज जगभरात अशांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अग्नीच्या ज्वाळा धगधगत आहेत, मानवी मनं दुभंगत आहेत. बुद्ध, ईश्वर, अल्ला, गॉड, अरहंत यांचा जयघोष वाढतो आहे. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन वाढते आहे. मात्र, माणुसकीचे काय? रक्तदान करून जीवदान देऊ शकणारे रक्त हिंसाचारात सांडले जात आहे. अशा पार्श्वभूमीवर शांतीचा संदेश देणारे महामानव व संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते.
मोठ्या ताजबाग येथील फैजान-ए-ताजुल औलिया ओल्ड एज होम संस्थेने अशा समाजसेवकांचा गौरव ‘मोहब्बत अवॉर्ड’ने करून माणुसकी जपणाऱ्यांना प्रेरणा देण्याचे मोठे कार्य केले आहे. मौलाना इर्शाद यांच्या पवित्र विचारांतून हा सन्मान सोहळा पार पडला. या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वरदादा रक्षक म्हणाले, “मानवतेच्या कार्यात योगदान देणारे खरे देवदूतच आहेत. अशा सन्मानामुळे समाजातील कार्यकर्त्यांना नवी उर्जा मिळते.”

या कार्यक्रमानिमित्त वेगवेगळ्या मदरशांतील विद्यार्थी-पालकांचे संमेलन, महंमद पैगंबरांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त समाजसेवकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. मदरशातील लहान मुलांनी राष्ट्रभक्तीपर गीतांमधून मानवतेचा संदेश दिला. दोन लहान बालिकांनी हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत केलेले सुंदर संचालन उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
भदंत संघरत्न माणके (जपान) म्हणाले : “ही मुले केवळ भारताचेच नव्हे, तर विश्वशांतीचे भविष्य आहेत. पालकांनी राग, लोभ, द्वेष, मत्सर यांचा त्याग करून मैत्रीभाव जपावा.” समाजसेवक सरदार जगजीतसिंग म्हणाले : “महापुरुषांच्या विचारांमुळेच नफरत भरलेल्या मनात प्रेमभाव निर्माण होऊ शकतो. जो धर्म नफरत करायला लावतो, तो धर्म नसून अधर्म आहे.”

मौलाना इश्तीयाक अहमद (मुस्लीम विचारवंत) म्हणाले : “कुराणचा विचार फक्त मुस्लीमांसाठी नसून संपूर्ण विश्वमानवाच्या कल्याणासाठी आहे. भारतभूमी ही संत व सूफींची पावन भूमी आहे. पैगंबर महंमद म्हणाले आहेत – ही भूमी जगाला शांती देणारी आहे.”
‘मोहब्बत अवॉर्ड’ ने सन्मानित :
पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल संपादिका संध्या राजुरकर, धार्मिक विधीमधील दानातून गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारे भन्ते नागदीपंकर, कर्मयोगी फाउंडेशनचे पंकज ठाकरे, गरजू विद्यार्थ्यांसाठी तत्पर शिक्षक प्रशांत हाडके, श्रमिक वस्तीतल्या मुलांना कलाक्षेत्रात घेऊन जाणारे रूपेश राऊत, पोलीस विभागातून निवृत्त समाजसेवक मधुकर टुले, ‘बळीराजा फाउंडेशन’च्या माध्यमातून गरीब रुग्णांना व हायवेवरील अपघातग्रस्तांना मदत करणारे रजनीकांत अतकरी, आनंद अंबरते, चंद्रभान राऊत, मोहन चोरे, निखील भूते, मुकेश कोल्हे आदी समाजसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित राष्ट्रवंदना “तन-मन-धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा” याच्या सामूहिक गजराने झाली. मुस्लीम युवकांच्या श्रमातून हा प्रेरणादायी सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.











Users Today : 3
Users Yesterday : 11