December 1, 2025 7:11 am

RED ALERT : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा रेड अलर्ट

हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस: तर उद्या ऑरेंज अलर्ट

2 तासांपूर्वी :>
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे, कारण हवामान विभागाने पुढील दोन दिवस म्हणजेच 28 आणि 29 सप्टेंबर रोजी राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
                         विशेषतः आधीच पुरामुळे त्रस्त असलेल्या मराठवाड्यासाठी हा इशारा चिंतेचा विषय ठरत आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रासाठीही हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यासाठी आज ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.
                         दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे 8 जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्‍यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदत कार्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

‘पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांसाठी ‘पुनरुज्जीवन आराखडा’ हवा, पंचनाम्यासाठी मुदतीचे बंधन नसावे’ : शरद पवारांची सरकारकडे मागणी

                        राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारने आपत्ती निवारणाची महत्त्वाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे आवाहन केले आहे. त्यांनी नुकसान भरपाईसोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा ठोस आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

 

कोकण किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

                        कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या मुसळधार पावसाचा आणि सध्याच्या अतिवृष्टीच्या परिस्थितीचा तातडीने आढावा घेतला. त्यांनी सर्व जिल्हा प्रशासनाला आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याचे आणि मनुष्य व पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

नाशिकमधील पूरस्थितीवर छगन भुजबळ ॲक्शन मोडवर

                         नाशिक जिल्ह्यातील पूर स्थितीवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील, पोलिस स्टेशन कार्यालयात तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावे. पूर परिस्थितीत अडकलेले नागरिक तसेच जनावरे सुरक्षित स्थळी हलवावे, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दूरध्वनी द्वारे दिले आहेत.

 

अहिल्यानगरातील दोन तालुक्यांत १०० हून अधिक बंधारे फुटले, दळणवळण विस्कळीत

                         अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात नऊ दिवसांत सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला, या पावसाचा ७२१ गावांना फटका बसला. सीना नदीला पूर येऊन नदीपात्र एक किलोमीटर रुंदावले. पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांतील १०० हून अधिक बंधारे व तलाव फुटले. अतिवृष्टीमुळे २ लाख ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, ज्याचा फटका जवळपास २ लाख ९० हजार शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या पंचनाम्यांचे काम सुरू असून, मदत व बचाव पथकांनी एक हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.
                           दरम्यान, राहाता तालुक्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. नगर-मनमाड महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. शिर्डीतील कालिका नगरसह अनेक भागांमध्ये घरांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. काही ठिकाणी नवरात्र उत्सवाचे मंडप कोसळल्याचेही वृत्त आहे. शिर्डीत रात्री दोनजण ओढ्यात वाहून गेले होते, मात्र प्रशासनाने त्यांना वाचवले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News