नागपुरात SBI बँकेवर फिल्मी स्टाइल दरोडा; 30 मिनिटांत आरोपी जेरबंद!

कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून 4 लाखांची रोकड लंपास; CCTVच्या आधारे पोलिसांची धडाकेबाज कारवाई

का टा वृत्तसेवा : आशिष हटवार 

नागपूर | प्रतिनिधी : नागपूरच्या सक्करदरा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत दिवसाढवळ्या धक्कादायक दरोड्याची घटना घडली. ग्राहकाच्या वेशात बँकेत शिरलेल्या सुरज भोजराज बोरकर (वय 28) याने कॅश काऊंटरवरील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून सुमारे 4 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. मात्र, बँक कर्मचाऱ्यांची तत्परता आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे आरोपीला अवघ्या 30 मिनिटांत, बँकेपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पकडण्यात आले.

मिरची पूड फेकताच बँकेत खळबळ

बँकेत ग्राहकाप्रमाणे प्रवेश केल्यानंतर आरोपी कॅश काऊंटरजवळ गेला. अचानक त्याने कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरची पूड फेकली. कर्मचाऱ्यांना काही समजण्यापूर्वीच त्याने कॅश काऊंटरवरील रोकड घेतली आणि बँकेबाहेर धूम ठोकली.

CCTV फुटेजमुळे तपासाला वेग

घटना लक्षात येताच बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बँकेतील तसेच परिसरातील CCTV फुटेज तपासून आरोपीच्या हालचाली आणि पळण्याचा मार्ग निश्चित केला. त्यानंतर परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम राबवण्यात आली.

30 मिनिटांत मुसक्या आवळल्या

पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला बँकेपासून जवळच पकडण्यात आले. त्याच्याकडून लुटलेली रोकड हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी B.Sc. पदवीधर असून बेरोजगार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, दरोड्यामागील नेमका हेतू आणि पूर्वनियोजन होते का, याचा तपास सुरू आहे.

दिवसाढवळ्या बँकेत झालेल्या या धाडसी दरोड्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, तरी अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आल्याने मोठा अनर्थ टळला.


🚨 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🚨

📲 आशिष हटवार :  9326169492 📲

1
0

Leave a Reply

Realted News