अंगणवाड्यांच्या विकासासाठी आमदार वानखेडे पुढे

अंगणवाड्यांच्या विकासासाठी आमदार वानखेडे पुढे
‘नगरोत्थान’मधून नवीन इमारतींचे आश्वासन; ‘कारंजा क्लब’च्या निवेदनाची दखल

का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल

कारंजा (घाडगे) / प्रतिनिधी : कारंजा शहरातील अंगणवाड्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक अंगणवाड्या सध्या भाड्याच्या व अपुऱ्या सोयी-सुविधांच्या खोल्यांमध्ये चालत असल्याने चिमुकल्यांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ‘कारंजा क्लब’ने आमदार सुमित वानखेडे यांच्याकडे निवेदन सादर करत लक्ष वेधले होते.

या निवेदनाची गंभीर दखल घेत आमदार वानखेडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’ अंतर्गत शहरातील अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र व सुसज्ज इमारती उभारण्याचे आश्वासन दिले आहे. नगर परिषद प्रशासनाला आवश्यक प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शहराच्या वाढत्या विस्ताराच्या तुलनेत शैक्षणिक सुविधा अपुऱ्या असल्याचे चित्र दिसून येत होते. अनेक प्रभागांतील अंगणवाड्या गळक्या, अंधाऱ्या व छोट्या खोल्यांमध्ये सुरू असून, खेळण्यासाठी जागा, स्वच्छ पिण्याचे पाणी व शौचालयांच्या सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.

‘कारंजा क्लब’च्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती संकलित करून आमदारांची भेट घेतली व परिस्थितीची जाणीव करून दिली. यावर आमदार वानखेडे यांनी चिमुकल्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा मजबूत पाया घालण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.

दरम्यान, आमदारांनी दिलेल्या आश्वासनामुळे शहरातील पालक व अंगणवाडी सेविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ‘कारंजा क्लब’च्या वतीने आमदारांचे आभार मानण्यात आले.

0
0

Leave a Reply

Realted News