अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक सुनेत्रा पवार आघाडीवर, मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष
बारामती | प्रतिनिधी : बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून ही निवडणूक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे होत आहे. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात असून, काँग्रेसने सुरुवातीला आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी नंतर माघार घेतली. तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने निवडणुकीचे चित्र बदलले आहे. तरीही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात एकूण 22 उमेदवार रिंगणात आहेत.
राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असला, तरी त्या किती मताधिक्याने विजय मिळवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी अजित पवार यांनी बारामतीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे तोच विक्रम मोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, Parth Pawar यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. “विजय निश्चित असला तरी मताधिक्य वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.









