एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस; खासगी ट्रॅव्हल्सला मिळणार आव्हान

१७० आरामदायी आसनी, तर ३० शयनयान बसेसचा समावेश; डिजिटल आरक्षणाची सुविधाही उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक वातानुकूलित स्वमालकीच्या व्होल्वो बसेस दाखल होणार असून, त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली.

बसेसचे स्वरूप

  • एकूण २०० वातानुकूलित व्होल्वो बसेस ताफ्यात दाखल होणार.
  • १७० बसेस आरामदायी ४५ आसनांच्या असतील.
  • ३० बसेस शयनयान स्वरूपाच्या असतील.
  • ५ ते ६ तासांच्या प्रवासासाठी आसनी बसेस, तर रात्रीच्या प्रवासासाठी शयनयान बसेस उपलब्ध करून दिल्या जातील.

डिजिटल आरक्षणाची सुविधा

प्रवाशांना खासगी ॲपच्या माध्यमातूनही तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल बुकिंग आणि दर्जेदार प्रवासी सेवांच्या माध्यमातून एसटी महामंडळ लांब पल्ल्याच्या प्रवासात आपली सेवा अधिक सक्षम करण्याच्या तयारीत आहे.

खासगी ट्रॅव्हल्सला आव्हान

२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या मार्गांवर खासगी ट्रॅव्हल्सचा मोठा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत खासगी वाहतूक सेवांना स्पर्धा देण्याची रणनीती एसटी महामंडळाने आखली आहे.

प्रताप सरनाईक म्हणाले, “प्रवाशांचा विश्वास आणि एसटीचे विस्तृत जाळे ही आपली मोठी ताकद आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल आरक्षण आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या प्रवासात एसटी नवा अध्याय रचत आहे.” एसटीच्या या निर्णयामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

0
0

Leave a Reply

Realted News