एसबीएल नागपूर स्फोटप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा;
सरकारवर विजय वडेट्टीवारांची टीका
नागपूर | प्रतिनिधी : नागपूरजवळील स्फोटके निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटानंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत या प्रकरणात सदोष मनुष्यवधाऐवजी थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, नागपूर शहरापासून अवघ्या सुमारे 10 किलोमीटर अंतरावर सुमारे 14 स्फोटके निर्मिती कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांमध्ये दरवर्षी विविध दुर्घटना घडत असून त्यात अनेक कामगारांचा जीव जात आहे. स्फोटक पदार्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) चे मुख्य नियंत्रण कार्यालय नागपुरात असतानाही इतक्या जवळ वारंवार स्फोट होणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयापासून ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक वेळा सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
या स्फोटात मृतांचा आकडा 23 वर पोहोचल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, अद्याप 7 ते 8 कामगार 75 टक्क्यांहून अधिक भाजलेले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेबाबत विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारकडून उत्तर मागण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“केवळ आर्थिक मदत जाहीर करून मृतांचे जीव परत येणार आहेत का? कामगारांच्या सुरक्षेसाठी सरकार नेमके काय करत आहे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणात केवळ सदोष मनुष्यवधाचा नव्हे तर थेट खुनाचा गुन्हा दाखल करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

गेल्या काही वर्षांतील मोठे अपघात
नागपूर जिल्ह्यातील स्फोटके निर्मिती कारखान्यांमध्ये गेल्या काही वर्षांत वारंवार दुर्घटना घडल्याची नोंद आहे.
-
मार्च 2026 – राऊळगाव (SBL Energy) : स्फोटात 23 हून अधिक कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी.
-
डिसेंबर 2023 – बाजरगाव (Solar Industries) : स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू, त्यात 6 महिला.
-
2025 – कोटवलबर्डी (Asian Fireworks) : स्फोटात 2 जणांचा मृत्यू.
-
2025 – उमरेड (MMP Industries) : स्फोटात 7 जणांचा मृत्यू.
-
2024 – धामणा (Chamundi Explosives) : स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू.
-
2023 – आर्थिक एक्सप्लोसिव्ह कंपनी : स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू.
उपलब्ध अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत किमान 35 कामगारांचा मृत्यू झाला असून 40 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. त्यामुळे स्फोटके उद्योगातील कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0