‘ओम प्रजातंत्राये नमः… कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयातील महत्त्वपूर्ण रेकॉर्ड स्वाहा!’
पहाटेच्या भीषण आगीत लाखो नागरिकांच्या नोंदींसह कोट्यवधींच्या विकासकामांच्या फायली जळाल्या;
घातपाताचा संशय, उच्चस्तरीय न्यायालयीन किंवा एसआयटी चौकशीची मागणी
काटा वृत्तसेवा | संजय श्रीखंडे
कळमेश्वर : कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयाला मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत नगरपरिषदेचे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज, संगणकीय माहिती, विकासकामांच्या फायली, आर्थिक नोंदी आणि नागरिकांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण अभिलेख जळून खाक झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रशासनाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर दुर्घटना मानली जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या तीन-चार वर्शातील प्रशासकीय राजवटीत शेकडो करोडो रुपयांच्या रस्ता, नाली बांधकाम, पाणीपुरवठा साहित्य, अग्निशमन बंब, कचरा गाड्या, ट्रॅक्टर खरेदीच्या महत्त्वपूर्ण फाईल्स, अनाव”यकरित्या वारंवार खरेदी करण्यात आलेले ग्रीन जीमचे साहीत्यांचे व्हाॅवचर्स व बीलांचा महत्वपुर्ण रेकाॅर्ड, जन्ममृत्यू, घरटॅक्स व पाणीकराचा कागदी तथा काॅम्पुटराइज्ड रेकाॅर्ड या आगीत भस्मसात झाला असल्याची विशवसनिय माहीती आहे. अत्यंत संशयास्पद व घातपातसदृशय 90 टक्केपेक्षा जास्त जळालेल्या या कार्यालयातील महत्वपुर्ण फायली, फर्निचर, पार्टीशन्स व खुराडेवजा कॅबीनचा समावेश आहे.
घटनेनंतर आगीमागे केवळ अपघात आहे की यामागे घातपात अथवा पुरावे नष्ट करण्याचा कोणताही कट होता, याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असून नागरिकांकडून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटनेचा उलगडा
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास रात्रीच्या ड्युटीवरील सुरक्षा रक्षक गुंडेराव कुंबरे यांना नगराध्यक्षांच्या केबिनच्या दिशेने धूर येताना दिसला. त्यांनी तत्काळ पाहणी केली असता कार्यालयात आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुख्याधिकारी, संबंधित अधिकारी, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली.

अनेक विभागांचे महत्त्वाचे अभिलेख जळून खाक
आगीची तीव्रता एवढी मोठी होती की नगरपरिषदेतील अनेक विभागांमधील कागदपत्रे, संगणक, कार्यालयीन साहित्य, फर्निचर, पार्टिशन्स, रेकॉर्ड रूममधील फायली आणि विविध अभिलेख पूर्णपणे जळून खाक झाल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे.यामध्ये विशेषतः खालील नोंदींचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे –
- जन्म-मृत्यू नोंदी
- घरपट्टी व पाणीकर अभिलेख
- संगणकीकृत माहिती
- विकासकामांच्या प्रशासकीय फायली
- रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा योजनांशी संबंधित कागदपत्रे
- अग्निशमन वाहन, कचरा वाहने, ट्रॅक्टर खरेदीच्या नोंदी
- विविध साहित्य खरेदीची बिले, व्हाउचर्स आणि आर्थिक अभिलेख
या सर्व नुकसानीची अधिकृत माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार असली तरी मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचा शासकीय डेटा नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घातपात की अपघात? अनेक प्रश्न अनुत्तरित
आग नेमकी कशी लागली? शॉर्टसर्किट झाले की अन्य कोणते कारण होते? कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का? सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे का? आग सर्वप्रथम कोणत्या भागात लागली? आग इतक्या झपाट्याने कशी पसरली?
या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नसून तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
घटनेच्या स्वरूपामुळे नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या शंका उपस्थित होत असून, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी वैज्ञानिक, तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपास होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह आमदारांनी घेतला घटनास्थळाचा आढावा
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष देशमुख यांनीही घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
आमदारांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल तसेच आग लागण्यामागील नेमके कारण शोधून जबाबदार आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. नगरपरिषदेचे कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी आवश्यक पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोहपा व वाडीच्या अग्निशमन दलाने निभावली जबाबदारी
आगीची माहिती मिळताच मोहपा आणि वाडी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अनेक तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत कार्यालयाचा मोठा भाग आणि त्यातील साहित्य जळून गेले होते.

अग्निसुरक्षेवरच प्रश्नचिन्ह
नगरपरिषदांकडे अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असताना स्वतःच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे संरक्षण करण्यात अपयश का आले? अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती का? फायर ऑडिट वेळेवर झाले होते का? आपत्कालीन सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले होते का? शासनाने नगरपरिषदांना अग्निशमन व्यवस्थेने सुसज्ज करताना त्याचा फायदा क्षेत्रातील बहुसंख्य गावांना होण्याचे अपेक्षित आहे कळमेश्वर नगर परिषदच्या कार्यालयाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषद मोहपा नगरपरिषद वाडी येथील अग्निशमन गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन अग्निशमन जवानांनी आपले कर्तव्य बजावल्याचे दिसून आले. परंतु स्थानिक नगर प्रशासनाच्या निश्काळजी पूर्ण व निकृष्ट दर्जाच्या व्यवस्थापना ची खुद्द नगरपरिषद बळी ठरली आहे. बुडाखाली अंधार तो हाच का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नांचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी
या घटनेत नष्ट झालेल्या कागदपत्रांचे स्वरूप, त्यामागील कारणे आणि संभाव्य जबाबदारी लक्षात घेता या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र फॉरेन्सिक तपासणी, अग्नितज्ज्ञांचा अहवाल आणि आवश्यक असल्यास विशेष तपास पथक (SIT) किंवा इतर सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून पुढे येत आहे.
तपासातून जर कोणत्याही व्यक्तीचा निष्काळजीपणा, कर्तव्यातील हलगर्जीपणा, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न किंवा अन्य कोणताही बेकायदेशीर प्रकार समोर आला, तर संबंधित दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून त्यांना न्यायालयासमोर उभे करावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
सध्या तपास सुरू
पोलीस प्रशासन, अग्निशमन विभाग आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून अधिकृत तपास अहवालानंतरच या घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत सर्व शक्यतांचा निष्पक्ष आणि पुराव्यांच्या आधारे तपास होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.





