कळमेश्वरात पाणीटंचाईचा कहर; मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात संताप
शिंदेसेनेच्या महिला तालुका प्रमुख गायत्री अढावु फूलारे पाण्यासाठी आक्रमक
आठ दिवसांपासून अनेक भागांत नळ कोरडे; नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर : कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. अनेक भागांमध्ये नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकर आणि खासगी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीसाठी नगर परिषदेच्या प्रशासनाला जबाबदार धरत नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
🔴 नगर परिषद प्रशासनाविरोधात संतापाची लाट


🔴प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार?
शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असताना त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात नगर परिषद प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. इंटेकवेल, जलवाहिनी आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटींची माहिती आधीपासून असतानाही वेळेत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
🔴महिलांची सर्वाधिक परवड
पाणी भरण्यासाठी पहाटेपासून महिलांना रांगा लावाव्या लागत असून अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. घरगुती वापरासाठी आवश्यक पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
🔴नगरसेवक निवडणुकीत व्यस्त, नागरिकांचे प्रश्न वाऱ्यावर
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील पाणी संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. दुसरीकडे संभाव्य निवडणुकांच्या राजकारणात अनेक पदाधिकारी आणि इच्छुक व्यस्त असल्याने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.
🔴मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
शहरातील गंभीर पाणीटंचाई रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कृती आराखडा जाहीर करावा, अतिरिक्त टँकर सुरू करावेत तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
🔴जनतेचा सवाल
“शहरात आठ दिवसांपासून नळ कोरडे आहेत, नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत, मग नगर परिषद प्रशासन नेमके काय करत आहे?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
🔴चौकशीची मागणी
पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी, नियोजनातील हलगर्जीपणा आणि प्रशासनाच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.










