जिओ पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री आढळलेल्या ३७ वर्षीय महिलेला सुरक्षितपणे सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल; ओळख पटवून कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
का टा वृत्तसेवा I सतीश पांडे
कळमेश्वर, दि. ६ : कळमेश्वर परिसरातील जिओ पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री एक अनोळखी महिला आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली. मात्र, पोलिस, पोलिस पाटील, महिला होमगार्ड आणि सामाजिक व रुग्णसेवक यांच्या तत्परतेमुळे महिलेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली असून, आता तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता गस्तीच्या वेळी ही महिला जिओ पेट्रोल पंपाजवळ आढळली. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर पोलिस तसेच पोलिस पाटील ज्योती निमजे (फेटरी), सोनाली भांगे (आष्टी) आणि महिला होमगार्ड माधवी कडू यांच्या मदतीने महिलेची चौकशी करण्यात आली. या वेळी महिलेने आपले नाव शिखारसिंह तारकेश्वरसिंह (वय ३७) असून, ती अनेपूर डोभी, जिल्हा जौनपूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगितले.
रेल्वेने बंगळुरूहून नागपूरला; रस्ता चुकल्याने कळमेश्वरात
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती बंगळुरूहून रेल्वेने नागपूर येथे आली होती. त्यानंतर रस्ता चुकल्याने एका व्यक्तीच्या मोटारसायकलवर बसून दहेगाव परिसरात उतरल्याचे तिने सांगितले.
महिलेकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अद्याप तिच्या नातेवाईकांचा ठोस पत्ता किंवा संपर्क निश्चित झालेला नाही.

सुरक्षिततेसाठी सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल
महिलेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कळमेश्वर पोलिसांनी तिला नागपूर येथील सखी वन स्टॉप सेंटरमध्ये सुरक्षितपणे दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, PSI मन्नान नवरंगाबादे आणि पोलीस कर्मचारी राणा ठाकूर करीत आहे.
या प्रकरणात पोलिसांसोबतच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे, पोलिस पाटील आणि महिला होमगार्ड यांनी दाखवलेली तत्परता महत्त्वाची ठरली. संकटात किंवा अनोळखी अवस्थेत आढळलेल्या महिलेला केवळ चौकशीपुरते न थांबता तिच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आल्याने मानवी संवेदनशीलतेचे उदाहरण समोर आले आहे.
नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन
सदर महिलेला ओळखणाऱ्या व्यक्तींनी किंवा तिच्या कुटुंबीयांनी कळमेश्वर पोलीस ठाणे अथवा सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे यांच्याशी तातडीने संपर्क साधावा. महिलेची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क I सतीश पांडे :
9561480227










