महाप्रसादावर नियमांचा बडगा की नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा?; FDAच्या भूमिकेवरून नवा वाद

“अन्नसुरक्षेला विरोध नाही, पण नियम सर्वांसाठी समान हवेत”; मंदिर महासंघाचा आक्षेप, FDAचा आरोग्यसुरक्षेवर भर

नागपूर : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसाद, भंडारा आणि अन्नदानासाठी अन्नसुरक्षेचे नियम लागू करण्याच्या FDAच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. मंदिर महासंघ आणि काही हिंदू संघटनांनी या नियमांवर आक्षेप घेत धार्मिक आणि सेवाभावी अन्नदानाला व्यावसायिक खाद्यविक्रीप्रमाणे वागणूक देऊ नये, अशी मागणी केली आहे.

मात्र, FDAचा मुख्य उद्देश धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करणे नसून मोठ्या संख्येने नागरिकांना दिले जाणारे अन्न सुरक्षित आणि स्वच्छ आहे की नाही, याची खात्री करणे हा आहे. FDAच्या म्हणण्यानुसार ही अन्नसुरक्षा व्यवस्था केवळ हिंदू धार्मिक कार्यक्रमांसाठी नसून भंडारा, इफ्तार, लंगर आणि इतर सामुदायिक अन्नवाटप कार्यक्रमांनाही लागू आहे.

महासंघाचा आक्षेप नेमका काय?

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या नागपूर शाखेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे निवेदन दिले आहे. महाप्रसाद आणि भंडारे हे श्रद्धा व सेवाभावातून केले जातात; त्यामुळे त्यांच्यावर अनावश्यक परवाने, नोंदणी आणि प्रशासकीय अटी लादू नयेत, अशी महासंघाची भूमिका आहे.

त्याचवेळी, अन्नसुरक्षेच्या नियमांना विरोध नसून ते सर्व धर्मांना आणि सर्व सार्वजनिक अन्नवाटप कार्यक्रमांना समान पद्धतीने लागू करावेत, अशी मागणी महासंघाने केली आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नको

महाप्रसाद असो, भंडारा, इफ्तार किंवा लंगर—अन्न घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळणे महत्त्वाचे आहे. मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करताना स्वच्छता, कच्च्या मालाची गुणवत्ता, साठवणूक आणि अन्नवाटपाची पद्धत याकडे दुर्लक्ष झाल्यास अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे श्रद्धा आणि अन्नसुरक्षा यांना परस्परविरोधी न मानता, दोन्हींचा समतोल साधण्याची गरज आहे.

नियम कडक असावेत; पण पारदर्शक आणि समानही असावेत

या संपूर्ण प्रकरणात प्रशासनासमोर दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या- स्पष्ट अपेक्षा आहेत आहेत. 1. नागरिकांना सुरक्षित अन्न मिळेल याची खात्री करणे. 2. कोणत्याही धर्म, पंथ किंवा उत्सवाला वेगळा निकष न लावता नियमांची समान अंमलबजावणी करणे.

मोठ्या प्रमाणावर अन्नवाटप करणाऱ्या आयोजकांना नियमांची माहिती देणे, पूर्वसूचना आणि आवश्यक प्रक्रिया सुलभ करणे, तसेच अन्नसुरक्षेच्या मूलभूत बाबींवर मार्गदर्शन करणे हा कठोर कारवाईपेक्षा अधिक परिणामकारक मार्ग ठरू शकतो.

महाप्रसादाची परंपरा कायम ठेवत अन्नसुरक्षेची काळजी घेणे शक्य आहे. त्यामुळे “FDA विरुद्ध महाप्रसाद” असा संघर्ष न करता “श्रद्धाही जपूया, नागरिकांचे आरोग्यही सुरक्षित ठेवूया”, हा संतुलित दृष्टिकोन अधिक योग्य ठरेल.


FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की ही व्यवस्था केवळ महाप्रसाद किंवा हिंदू उत्सवांसाठी नसून बंधारा, महाप्रसाद, इफ्तार, लंगर, विवाह समारंभ अशा विविध सार्वजनिक अन्नवाटप कार्यक्रमांसाठी समान स्वरूपात लागू करण्याचा उद्देश आहे. FDA च्या म्हणण्यानुसार हा उत्सवांवर नियंत्रण ठेवण्याचा आदेश नसून अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीची प्रक्रिया आहे.


0
0

Leave a Reply

Realted News