सांस्कृतिक लोककला मंचाचा भव्य सत्कार सोहळा; लोककलावंतांच्या मानधनासाठी सभागृहात आवाज उठविण्याची डॉ. पोतदारांची ग्वाही
सतीश पांडे | प्रतिनिधी
कळमेश्वर : सांस्कृतिक लोककला मंच ऑल इंडिया यांच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी सावता मंदिर सभागृह, कळमेश्वर येथे कलावंत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार डॉ. राजीव पोतदार यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वृद्ध कलाकार मानधन समितीचे सदस्य प्रमोद बागडे यांच्या हस्ते डॉ. पोतदार यांना शाल, श्रीफळ व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. राजीव पोतदार यांनी लोककलावंत समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे सांगितले. शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेचा लाभ पात्र कलावंतांपर्यंत पोहोचण्यासाठी विधान परिषदेत शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. आशिष देशमुख यांनीही लोककलावंतांच्या मानधनासह विविध प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. प्रमुख अतिथी प्रिया मानकर यांनी लोककलावंतांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या हक्कांच्या प्रश्नांकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली.

मानधन समितीच्या सदस्यांचा सत्कार
यावेळी संजय भाकरे, कीर्तनकार ज्ञानेश्वर भोयर, सप्तखंजिरी वादक कीर्तनकार चेतन बेले, प्रकाश काळे गुरुजी, देविदास कटाने, किरण झाडे, युवराज मेश्राम आणि अरविंद ढोले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विदर्भ शाहीर परिषदेचे अध्यक्ष मनीष भिवगडे, कार्याध्यक्ष शाहीर अलंकार टेंभुर्णे, दयाल कांबळे, पुरुषोत्तम निघोट, शाहीर गौरीशंकर गजभिये, शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे, शाहीर निनाद बागडे, उपाध्यक्ष मीनाताई धरमवाडी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा पपीता कोल्हे, संगीता चचाने, अरुण वाहने, जिल्हाध्यक्ष सुनील भजभुजे, रूपाली खोले, प्रमोद हत्ती, नितीन गेडाम आणि माने गुरुजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विविध भजन मंडळे, शाहीर मंडळे, दंडार पथके व कीर्तनकारांच्या कलाविष्कारांनी कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद बागडे यांनी केले, तर आभार किशोर भायदे यांनी मानले. आयोजनासाठी राष्ट्रीय महासचिव किशोर भायदे, मनीषा पिंपळशेंडे, भूमेश्वर वाघमारे, पिलाजी पोतले, नरेंद्र ठाकरे, पुरुषोत्तम पारधी, नंदकिशोर पाटील, नामदेव बुरडे, इंद्रसेन शेडामे, अशोक पराते, कल्पना पाटणकर, अनिता कटरे, बेबीताई निखाडे, शीला कळंबे, वर्षा गवळी आणि उषा मदनकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शेकडो कलावंत व रसिक उपस्थित होते.










