कळमेश्वर येथे तालुकास्तरीय प्रेरणादायी शिक्षण परिषद उत्साहात
काटा वृत्तसेवा I
कळमेश्वर : पंचायत समिती कळमेश्वर अंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने तसेच निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने ‘माझा वर्ग माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रेरणादायी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. कळमेश्वर नगरपरिषद हायस्कूल येथे आयोजित या परिषदेला जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक, नगरपरिषद तसेच खासगी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांनी तालुक्याने क्रीडा व शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर राहण्यासाठी शिक्षकांनी नावीन्यपूर्ण व प्रभावी उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे यांनी आगामी निपुण चाचणीत शंभर टक्के विद्यार्थी निपुण घोषित होतील, या उद्दिष्टासाठी विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव घेण्यावर भर देण्याचे मार्गदर्शन केले. तसेच खासगी शाळांनी जिल्हा परिषद शाळांशी समन्वय साधून पटसंख्या वाढीसाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात निपुण महाराष्ट्र अंतर्गत निपुण घोषित झालेल्या रेखडे विद्यालय पिपळा (किनखेडे), कृष्णराव वानखेडे विद्यालय कोहळी, उच्च प्राथमिक शाळा तोंडाखैरी, प्राथमिक शाळा वाठोडा तसेच नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा मोहपा या पाच शाळांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या प्रभावी शैक्षणिक उपक्रमांच्या ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ संदर्भात शिक्षक राजेंद्र गिरडकर, शीला सातपुते, संदीप मानमोडे, पंकज लांडे आणि पंकज कांडलकर यांनी सादरीकरण करून अनुभव मांडले.
परिषदेचे प्रास्ताविक उमेशसिंग कच्छवाह यांनी केले. संचालन किरण वंजारी यांनी केले, तर आभार केंद्रप्रमुख डॉ. कीर्ती पालटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय मेश्राम, आकाशचंद्र रामटेके, बाळू करमकर, माधुरी जाधव, भारती कडू, अनिल कानफाडे, कीर्ती इटनकर, जयमाला मरसकोल्हे, रोशनी फलझेले, धांडे आदींनी सहकार्य केले.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0