कारंजा येथे ‘पाडवा पहाट’ उत्साहात संपन्न; नववर्षाचे जल्लोषात स्वागत
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा : मराठी नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने कारंजा येथे आयोजित ‘पाडवा पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटेच्या मंगल वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गुढी उभारणी व पूजनाने झाली. त्यानंतर विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. स्थानिक गायक प्रफुल कामडी, दिपक ढोले, अतुल कुहीके आणि जानवी भस्मे यांनी सुरेल गायन सादर केले. वाद्यसंगतीत हार्मोनियम वादक दिनेश कळसाईत व लीलाधर चोपडे, ढोलक वादक अमोल ठोंबरे तसेच तबला वादक अंश कळसाईत यांनी प्रभावी साथ दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया विनोद ठोंबरे आणि पवन ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक प्रेम महिले यांनी सादर केले, तर स्वागत मारोती लोखंडे यांनी केले. समारोप विनोद ठोंबरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन, गट विकास अधिकारी प्रवीण देशमुख आणि माजी प्राचार्य तथा वृक्ष मित्र परिवाराचे संयोजक विलास वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी गुढीपाडव्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या कलाकारांसह प्रदीप कामडी (डेकोरेशन), हेमराज (बालू) वंजारी (साऊंड व्यवस्था) आणि मेघराज बारंगे (फोटोग्राफी) यांचा सत्कार करण्यात आला.
पाडवा पहाट उत्सव समितीचे संयोजक प्रेम महिले, विनोद ठोंबरे आणि मारोती लोखंडे यांनी दानदाते व उपस्थितांचे आभार मानत, दरवर्षी अशाच संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या उपक्रमामुळे कारंजा शहरात सांस्कृतिक वातावरण निर्माण होऊन नवचैतन्याची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.









