कारंजा शहरात एकाच रात्री चार घरांवर चोरट्यांचा धुमाकूळ

कारंजा शहरात एकाच रात्री चार घरांवर चोरट्यांचा धुमाकूळ
दोन घरफोड्या यशस्वी; दोन ठिकाणी प्रयत्न हाणून पाडले – नागरिकांत भीतीचे वातावरण

काटा वृत्तसेवा/ परमानंद मुदगल

कारंजा, दि. २२ मार्च — शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरांना लक्ष्य करत धाडसी घरफोड्यांची मालिका घडवून आणली. यापैकी दोन घरांत चोरी यशस्वी झाली असून दोन ठिकाणी रहिवाशांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचे प्रयत्न फसले. या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मनोहर देशमुख हे आपल्या वरुड येथील गावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या कुलूपबंद घरावर डल्ला मारला. रात्री सुमारे १.३० ते २.०० वाजण्याच्या दरम्यान गेट व मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करण्यात आला. चोरट्यांनी कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत सुमारे ८,००० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

यानंतर मागील गल्लीत राहणारे सत्यनारायण प्रल्हाद आघाव हेही आपल्या बायगाव (बुजरूक) येथे गेले असल्याचा फायदा घेत त्यांच्या घरात चोरी करण्यात आली. चोरट्यांनी कपाटातील वस्तूंची उलथापालथ करत पर्समधील ४,००० रुपये आणि चिल्लर १,००० रुपये असा एकूण ५,००० रुपयांचा ऐवज लंपास केला.

दरम्यान, आघाव यांच्या घरासमोरील शिरपूरकर यांच्या गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात एकट्या असलेल्या महिलेला संशय आल्याने त्यांनी आरडाओरड केल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर जवळच राहणाऱ्या राजेश खवशी यांच्या घराचेही गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न झाला. मात्र खवशी यांच्या मुलीने तत्परतेने दरवाजा अडवून जोरात ओरड केल्याने चोरटे तेथूनही फरार झाले.

या घटनेपूर्वी दोन दिवसांपूर्वी राममंदिर व हायवे परिसरातील बकुल जसानी यांच्या किराणा दुकानातही चोरी झाली होती. त्यामुळे शहरात चोरीच्या घटनांत वाढ झाल्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चोरटे दिवसा बंद घरांची पाहणी करून रात्री चोरी करीत असल्याचा संशय आहे.

प्रभाग क्रमांक १६ मध्ये यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या असून, आता पुन्हा एकाच रात्री चार ठिकाणी चोरीचे प्रकार घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News