December 1, 2025 7:02 am

कारंजा शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी

नागरी समस्या संघर्ष समितीने नगरपंचायतीकडे दिले निवेदन

का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा (घाडगे) : कारंजा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी व मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरी समस्या संघर्ष समितीने कारंजा नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अलीकडच्या काळात शहरात चोरी, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि इतर गुन्हेगारी घटना वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी अत्यावश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बस स्टँड, गोळीबार चौक, मुख्य मार्केट रोड, पंचायत समिती चौक, मॉडेल हायस्कूल व मॉडेल महाविद्यालय परिसर, जयस्तंभ चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती चौक तसेच शहरातील सर्व प्रमुख शाळा, महाविद्यालये, रस्ते आणि चौक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास मदत होईल.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नगरपंचायतीने तातडीने या प्रस्तावावर कार्यवाही करावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे.
हे निवेदन नगरपंचायतचे मुख्याधिकारी विक्रम शिर्के यांनी स्वीकारले. या वेळी नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News