खापरखेडा पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करा!


मेट्रो प्रकल्पाच्या महाव्यवस्थापकांकडे आमदार डॉ. आशिष देशमुख यांची आग्रही मागणी

नागपूर : नागपूरच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात सीताबर्डी ते कोराडी (अंदाजे ११.५ किमी) या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर, भविष्यातील वाहतूक आणि औद्योगिक वाढ लक्षात घेऊन मेट्रो मार्गाचा विस्तार खापरखेडा पर्यंत करण्याची आग्रही मागणी सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मेट्रो प्रकल्पाचे महाव्यवस्थापक श्रवण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
१७ ऑक्टोबर, शुक्रवार रोजी आमदार डॉ. देशमुख यांनी महाव्यवस्थापक हर्डीकर यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी खापरखेडा परिसराचे वाढते औद्योगिक आणि भौगोलिक महत्त्व अधोरेखित करत, शहराला मेट्रो जाळ्याशी जोडण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
डॉ. देशमुख म्हणाले, “खापरखेडा शहर अल्पावधीतच औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे दोन मोठी औष्णिक वीज निर्मिती केंद्रे, कोळसा खाणी आणि अनेक लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामुळे या परिसराची लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण झपाट्याने वाढत आहे. शिवाय खापरखेडा हे छिंदवाडा-जबलपूर राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने सतत जड वाहनांची वर्दळ असते आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे.”

त्यामुळे मेट्रोचा विस्तार खापरखेडा पर्यंत होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “या मार्गाचा विस्तार केल्यास खापरखेडा सारख्या महत्त्वाच्या औद्योगिक शहराला थेट नागपूर मेट्रो नेटवर्कशी जोडणे शक्य होईल. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होतील, पर्यावरणावरचा ताण घटेल आणि परिसराच्या आर्थिक तसेच सामाजिक प्रगतीला गती मिळेल,” असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
या भेटीत महाव्यवस्थापक श्रवण हर्डीकर यांनी खापरखेडा मेट्रो विस्ताराबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. तसेच परिसराचे औद्योगिक महत्त्व, भविष्यातील प्रवासी संख्येचा अंदाज आणि विकासाच्या गरजा विचारात घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन आमदार डॉ. देशमुख यांना दिले.

0
0

Leave a Reply

Realted News