अकोल्यात एएसआयचे लज्जास्पद कृत्य
कोठडीतील महिलेकडे अश्लील मागणी, एएसआय निलंबित
अकोला : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस दलावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी संतापजनक घटना अकोल्यात घडली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या एका महिलेकडे तिच्या मुलीला शरीरसुखासाठी पाठवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर (एएसआय) करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले असून त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश जाधव असे आरोपी एएसआयचे नाव असून, ते सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटक झालेल्या एका महिलेला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. त्यावेळी कर्तव्यावर असताना आरोपी अधिकाऱ्याने मंगळवारी रात्री संबंधित महिलेकडे गैरवर्तन करत तिच्या मुलीला शरीरसुखासाठी पाठवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. यासाठी त्याने पैशांचे आमिषही दाखविल्याचे समोर आले आहे.
या प्रकाराची माहिती संबंधित महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपीला समोर घेऊन कठोर शब्दांत कानउघाडणी केली. “वर्दीची लाज राखली नाही का?” अशा शब्दांत त्यांना सुनावण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात वरिष्ठ अधिकारी आरोपीला जाब विचारताना दिसत आहेत.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करत राजेश जाधव यांना निलंबित केले आहे. तसेच त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पोलिस कोठडीत असलेल्या महिला आरोपींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. न्यायालयांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महिलांची चौकशी महिला पोलिसांच्या उपस्थितीतच होणे, स्वतंत्र व सुरक्षित कोठडीची व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख, तसेच अटकेनंतर कुटुंबीयांना तत्काळ माहिती देणे यांसारख्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.









