कळमेश्वरात चोरट्यांनी फोडली तीन दुकाने : हजारो रुपयांचा ऐवज लंपास

कळमेश्वरात चोरट्यांनी फोडली तीन दुकाने
वाढत्या चोरीच्या घटना, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे

कळमेश्वर : शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन दुकानांचे शटर वाकवून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

                         प्राप्त माहितीनुसार, चोरट्यांनी वैभव बार अँड रेस्टॉरंट, आर. के. बार अँड रेस्टॉरंट तसेच इंगळे पशुखाद्य भांडार या दुकानांना लक्ष्य केले. जॅकच्या साहाय्याने शटर वाकवून त्यांनी दुकानांत प्रवेश केला आणि हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला.

                        वैभव बारचे मालक रितेश लक्केवार (वय ५३) यांनी काउंटरमध्ये ठेवलेली सुमारे ७,३०० रुपयांची रोकड तसेच सुमारे १,२०० रुपयांच्या बिअरच्या बाटल्या असा एकूण ८,५०० रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे.

                         मात्र, विशेष बाब म्हणजे गेल्या एका महिन्यातील ही चौथी चोरीची घटना आहे. तरीही पोलिसांना अद्याप एकही आरोपी पकडण्यात यश आलेले नाही किंवा चोरीस गेलेला मालही हस्तगत करण्यात आलेला नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

                        एकाच रात्रीत सलग चार-पाच दुकाने फोडून नागरिकांचा माल लंपास करण्याची ही या महिन्यातील चौथी घटना आहे. यापुर्वी मोहपा ,कोहळी, एमआयडीसी कळमेश्वर येथे चोरट्यांनी दुकाने फोडण्याची श्रुंखलाच चालवून व्यापाऱ्यांचे जीने हराम केले आहे. यांतील चोरीस गेलेला माल तर सोडाच, परंतू एकही चोरटा पोलीसांच्या हाती लागत नाही, ही खरी शोकांतीका आहे. एकिकडे सलग चोरीच्या या लाजीरवाण्या घटनांनी पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांसाठी हा गंभीर चिंतेचा विषय आहे. 

सतत वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीची गस्त वाढवणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

0
0

Leave a Reply

Realted News