गुजरातच्या कच्छमधून 1180 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

गुजरातच्या कच्छमधून 1180 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

ब्राझीलमधून आलेला माल दिल्लीला पाठवण्याची तयारी

तीन परदेशी नागरिक अटक, एक फरार

कच्छ : गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर भारतीय तटरक्षक दल (Coast Guard) आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत तब्बल 1180 कोटी रुपये किमतीचे 118 किलो कोकेन जप्त केले. या प्रकरणात आतापर्यंत तीन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून, आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे.

गुजरातचे डीजीपी Dr. K.L.N. Rao यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसने मुंद्रा किनारपट्टी परिसरात संयुक्त अभियान राबवले. या कारवाईदरम्यान भारतीय सागरी हद्दीत संशयास्पद कंटेनर जहाजाला अडवण्यात आले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे जहाज ब्राझील, विविध लॅटिन अमेरिकन देश, मेक्सिको, अमेरिका आणि कराचीमार्गे गुजरात किनाऱ्यावर पोहोचले होते. जहाजावर नायजेरियन नागरिकत्व असलेले दोन संशयित उपस्थित होते. त्यापैकी एकाने कारवाईदरम्यान समुद्रात उडी मारून पळ काढल्याची माहिती आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये Clavin Chukwuma आणि Byaruhanga James यांचा समावेश आहे. याशिवाय जुम्मा नासिर उमर या नायजेरियन नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत या अमली पदार्थांची खेप दिल्लीतील द्वारका परिसरातील दोन व्यक्तींना पोहोचवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरात किनारपट्टीवर मोठी कारवाई; 1180 कोटींचे 118 किलो कोकेन जप्त, परदेशी तस्कर अटकेत
गुजरात किनारपट्टीवर मोठी कारवाई; 1180 कोटींचे 118 किलो कोकेन जप्त, परदेशी तस्कर अटकेत

समुद्रात फेकली जात होती संशयास्पद पाकिटे

गुजरात एटीएसच्या माहितीनुसार, मुंद्रा किनाऱ्यापासून सुमारे ५ नॉटिकल मैल अंतरावर जहाज संशयास्पदरीत्या उभे होते. कोस्टगार्डने अनेक तास जहाजावर गुप्त नजर ठेवली. याचदरम्यान जहाजातून काही पिशव्या समुद्रात फेकल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कोस्टगार्ड आणि एटीएसच्या पथकाने तातडीने जहाजाला वेढा घालत कारवाई केली.

कारवाईनंतर जहाज कच्छ बंदरावर आणण्यात आले असून, ड्रग्ज तस्करीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा तपास सुरू करण्यात आला आहे.

यापूर्वीही पोरबंदर किनाऱ्यावर मोठी कारवाई

यापूर्वी एप्रिल २०२५ मध्येही गुजरात एटीएस आणि कोस्टगार्डने पोरबंदर किनाऱ्याजवळ संयुक्त कारवाई करत सुमारे १८०० कोटी रुपये किमतीचे ३०० किलो ड्रग्ज जप्त केले होते. त्या वेळी तस्करांनी पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच ड्रग्जची पाकिटे समुद्रात फेकून आंतरराष्ट्रीय सागरी सीमेकडे पलायन केले होते.

गुजरात किनारपट्टीचा वापर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीसाठी होत असल्याचे पुन्हा एकदा या कारवाईतून स्पष्ट झाले असून, सुरक्षा यंत्रणांनी सागरी गस्त आणखी कडक केली आहे.

0
0

Leave a Reply

Realted News