ग्रामपंचायत सुसुंद्री येथे महिला बचत गट मेळावा उत्साहात संपन्न

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सामाजिक योजनांची माहिती; महिला आरोग्य, बचत, वृक्षारोपण आणि स्वयंरोजगारावर मार्गदर्शन

कळमेश्वर / (सुसुंद्री) : ग्रामपंचायत सुसुंद्री येथे गुरुवारी महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आयोजित या मेळाव्यात महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासोबतच आरोग्य, आर्थिक बचत, वृक्षारोपण आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाच्या प्रार्थना दिवे उपस्थित होत्या. त्यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. मंजुषा मडके यांनी महिलांचे आरोग्य आणि दैनंदिन जीवनात बचतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच दीप्ती मानकर यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले.

मेळाव्याला उमेश निनावे, दिलीप दिवटे, शबाना मॅडम, उन्नती प्रभाग संघाच्या अध्यक्षा सुनंदाताई वानखेडे, कांता वाकडे, कृषी सखी छाया पालिवाल आणि सरपंच सविता काळे यांच्यासह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सांस्कृतिक कार्यक्रमांतून महिलांच्या कलागुणांना वाव

मेळाव्यादरम्यान महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपापल्या कलागुणांचे सादरीकरण केले. काही महिलांनी नृत्य, तर काहींनी गायनाच्या माध्यमातून आपली कला सादर केली. या कार्यक्रमामुळे महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली.

बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगारावर भर

उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या विविध संधी कशा निर्माण करता येतील, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. एखाद्या उत्पादनाची निर्मिती करण्यापासून ते त्याच्या विक्रीपर्यंतची प्रक्रिया, उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्न करणे, या विषयांवर विशेष भर देण्यात आला.

या मेळाव्यात सुसुंद्री गावासह आजूबाजूच्या गावांतील महिलांनीही उत्साहाने सहभाग घेतला. महिलांमध्ये आर्थिक बचतीची सवय निर्माण करणे, शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे, आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रोत्साहित करणे, या दृष्टीने हा मेळावा उपयुक्त ठरला.

1
0

Leave a Reply

Realted News