कालिदास संस्कृत विद्यापीठात महानुभावीय मराठी हस्तलिखित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दुर्मिळ ग्रंथसंपदेचे मान्यवरांकडून कौतुक; मराठीच्या प्राचीन वाङ्मयपरंपरेचे घडले दर्शन

का टा वृत्तसेवा I  किशोर वासाडे

रामटेक / नागपूर, दि. ११ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह–२०२६’ अंतर्गत महानुभावीय मराठी हस्तलिखित प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिक, साहित्यप्रेमी आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यापीठाच्या ज्ञानभारतम् केंद्र व नागपूर येथील योगेश्वर हस्तलिखित संग्रहालय यांच्या सहकार्याने आयोजित प्रदर्शनात लीळाचरित्र, स्थानपोथी, रत्नमाला, लक्षण बंद, रुख्मिणी स्वयंवर आदी दुर्मिळ ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती मांडण्यात आल्या होत्या. सकळ, सुंदरा, कवीश्वरी आणि वज्र या लिपींमधील हस्तलिखितांमधून महानुभाव पंथाची समृद्ध वाङ्मयपरंपरा आणि मराठी भाषेचा ऐतिहासिक वारसा उलगडला.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रदर्शनाला भेट देऊन या दुर्मिळ हस्तलिखितांचे कौतुक केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे, राजेश सोळंके, डॉ. कविता होले, डॉ. पराग जोशी, डॉ. प्रसाद गोखले आणि कुलसचिव डॉ. रोशन अलोने यांनीही या ज्ञानठेव्याच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.

योगेश्वर हस्तलिखित केंद्राचे प्रमुख पु.म.श्री. नितीन राज दादा बांधकर, ज्ञानभारतम् केंद्रप्रमुख डॉ. राजेंद्र जैन, डॉ. भारतभूषण शास्त्री, प्रा. तृषाल रामटेके, विकी पिपरेवार आणि किशोर भोयर यांच्या सहकार्याने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. भारतभूषण शास्त्री यांनी उपस्थितांना हस्तलिखितांमधील वैशिष्ट्ये आणि बारकावे समजावून सांगितले. कलाकार अभिजित कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी आणि अभिनेते दिगंबर नाईक यांनीही प्रदर्शनाला भेट दिली.

📢 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 

 किशोर माणिकराव वासाडे | 📲 9423403810

0
0

Leave a Reply

Realted News