“मी ही माहिती SIT ला पाठवली”; चाकणकरांच्या गुवाहाटी दौऱ्यावर दमानियांचा गंभीर दावा
भोंदू अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; ट्विटद्वारे चौकशीची मागणी
मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत नवा दावा केला आहे. गुवाहाटी दौऱ्याशी संबंधित एक फोटो ट्विट करत दमानिया यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, संबंधित माहिती विशेष तपास पथकाला (SIT) पाठवल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अशोक खरात याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण, जादूटोणा तसेच आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. या प्रकरणात काही राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध असल्याचेही समोर आले आहे. त्यातच रुपाली चाकणकर आणि खरात यांचे संबंध चर्चेत आले असून, त्यानंतर चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
दोन दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांनी एकत्र गुवाहाटी दौरा केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “रुपाली चाकणकर यांनी या फोटोबाबत स्पष्टीकरण दिले असले तरी हा फोटो माध्यमांकडे अचानक कसा पोहोचला, तो मुद्दाम पेरण्यात आला का, याचा तपास होणे आवश्यक आहे.” त्यांनी संबंधित वृत्तात केवळ रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात या तिघांचाच उल्लेख असल्याकडेही लक्ष वेधले.
दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये तीन मुद्दे उपस्थित केले आहेत.
पहिला मुद्दा म्हणजे, 28 ऑगस्ट 2021 रोजी गुवाहाटीला प्रत्यक्षात तीन जण गेले होते की 12 जण, याची चौकशी व्हावी. तसेच या दौऱ्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
दुसरा मुद्दा 30 जून 2023 च्या दौऱ्याबाबत आहे. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी रुपाली चाकणकर पुन्हा गुवाहाटीला गेल्या होत्या आणि 2 जुलै रोजी परतल्या. याच दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
तिसऱ्या मुद्द्यात त्यांनी संबंधित फोटो हा गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलचा नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. “मी ही माहिती SIT कडे पाठवली असून त्यांनी याचा तपास करावा,” अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांना गुरू मानल्याचे आणि त्यांची पाद्यपूजा केल्याचे यापूर्वी समोर आले होते. तसेच या प्रकरणात तपास यंत्रणांकडून त्यांची चौकशी अद्याप झालेली नसल्याने विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.











Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0