26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

मान्सूनची 5 दिवस आधी एन्ट्री!

26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

उष्णतेपासून दिलासा, मात्र पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज

नवी दिल्ली : देशभरात वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असताना मान्सूनबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा नैऋत्य मान्सून केरळमध्ये नेहमीपेक्षा तब्बल पाच दिवस आधी म्हणजेच 26 मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत वेळेआधीच पावसाची सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत.

साधारणपणे मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. मात्र यंदा तो 20 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर सक्रिय होऊन पुढे केरळकडे सरकणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सूनच्या लवकर आगमनामुळे प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक त्रस्त झाले आहेत. दिल्ली-एनसीआर परिसरात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून, काही भागांत धुळीचे वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र, मान्सून वेळेआधी येण्याची शक्यता असली तरी यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. यंदा देशात केवळ 80 सेंटीमीटर पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याचा सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास सिंचन व्यवस्था आणि खरीप हंगामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मान्सूनचे आगमन लवकर होणार असले तरी पावसाचे प्रमाण किती राहणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News