जादूटोण्याच्या संशयातून सुनेची निर्घृण हत्या!

सासऱ्याचा कुऱ्हाडीने डोक्यात घाव; सुनेचा जागीच मृत्यू

— महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पथक तातडीने घटनास्थळी

काटा वृत्तसेवा I प्रतिनिधी

नागपूर : जादूटोणा केल्याच्या संशयातून सासऱ्याने सुनेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील यशोधरानगर परिसरात घडली. या घटनेत लक्ष्मी रविशंकर पाली (४२) यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी सासरा नत्थूमल भगवान पाली (७२) याने जवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मी पाली यांचे पती रविशंकर यांचे २०१९ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर रविशंकर यांच्या मृत्यूला त्यांची पत्नी लक्ष्मी जबाबदार असल्याचा आणि त्यांनी जादूटोणा केल्याचा संशय नत्थूमल यांच्या मनात निर्माण झाला होता. याच संशयातून सासरा-सुनेमध्ये वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

१२ सप्टेंबर रोजी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी नत्थूमल यांनी कुऱ्हाडीने लक्ष्मी यांच्या डोक्यात वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त केली असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समिती घटनास्थळी

या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपूर पथकाने घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीय तसेच परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. जादूटोणा, करणी किंवा अशा प्रकारच्या अंधश्रद्धांमुळे हिंसाचाराला खतपाणी घालू नये, असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

जादूटोणा, करणी असे काहीही अस्तित्वात नाही. अशा प्रकारच्या दाव्यांना वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करण्याचे आव्हान समितीने दिले असून, त्यासाठी पुरस्कारही जाहीर केला आहे. मात्र आजपर्यंत कोणीही तो पुरस्कार मिळवू शकलेले नाही,” अशी भूमिका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

अंधश्रद्धेच्या संशयावरून कोणावरही मारहाण करणे, छळ करणे अथवा जीव घेणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवा आणि अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता विवेक, विज्ञान आणि कायद्याचा आधार घ्यावा, असे आवाहन समितीने केले.

यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुनील भगत, जिल्हा सचिव गौतम पाटील, शाखा सचिव कमलेश सतदेवे, राज्य विभागीय सदस्य देवयानी भगत, शाखा उपाध्यक्ष शोभा पाटील, शाखा कार्याध्यक्ष वर्षा सहारे, शारदा मोटघरे, अरविंद तायडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अंधश्रद्धेच्या नावाने होणाऱ्या हिंसाचाराला आळा घालण्याची गरज

जादूटोण्याच्या संशयातून एखाद्याचा जीव जाण्याची घटना ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून अंधश्रद्धा आणि अफवांमुळे समाजात निर्माण होणाऱ्या हिंसक प्रवृत्तीचे गंभीर उदाहरण आहे. कोणत्याही व्यक्तीवर जादूटोणा केल्याचा संशय असल्यास स्वतःहून कायदा हातात घेण्याऐवजी पोलिसांकडे तक्रार करणे हाच कायदेशीर मार्ग आहे.

कठोर शिक्षेसाठी जलद न्यायाची मागणी

या प्रकरणातील दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, यासाठी प्रकरणाची सुनावणी जलदगतीने (Fast Track Court) करण्याचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अंधश्रद्धेच्या संशयातून हिंसाचार करणाऱ्यांना कायद्याची कठोरता आणि परिणामकारकता स्पष्टपणे जाणवणे आवश्यक आहे.

जादूटोण्याच्या अफवांना बळी पडू नका; संशयावरून हिंसा करू नका. विवेक, विज्ञान आणि कायद्यालाच आधार द्या!

0
0

Leave a Reply

Realted News